इन्कम टॅक्स वेळेत भरणाऱ्यांना रेल्वे, विमानतळांवर मिळणार 'स्पेशल ट्रिटमेंट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 11:53 IST2018-10-16T07:15:24+5:302018-10-16T11:53:39+5:30
मोदी सरकार विशेष प्राधान्य देण्याच्या विचारात

इन्कम टॅक्स वेळेत भरणाऱ्यांना रेल्वे, विमानतळांवर मिळणार 'स्पेशल ट्रिटमेंट'
नवी दिल्ली: प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या नागरिकांना खास गिफ्ट देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. कर भरणा करताना सातत्य राखणाऱ्या व्यक्तींना अनेक सुविधांमध्ये प्राधान्य दिलं जाऊ शकतं. वेळेवर कर भरणाऱ्यांना विमानतळ, रेल्वे स्थानकं आणि टोल नाक्यांवर विशेष सवलत मिळू शकते. या ठिकाणी प्रामाणिकपणे कर देणाऱ्यांना रांगेत उभं राहावं लागणार नाही. प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर भरणाऱ्यांचा असा सन्मान करण्याचा विचार सध्या सरकारकडून सुरू आहे. मात्र अद्याप याबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही.
प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना विविध सेवांमध्ये विशेष प्राधान्य देण्याचा विचार आयकर विभागाकडून सुरू आहे. अशा करदात्यांना रेल्वे स्थानकं, विमानतळ, टोलवसुली केंद्रांवर विशेष सवलत दिली जावी, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर आयोग प्रयत्नशील आहे. पीटीआयनं या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. याबद्दलच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यावर तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर तो मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल.
प्रामाणिकपणे कर भरणा करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी नियमितपणे कर भरणाऱ्यांना एक विशिष्ट नंबर देण्यात येईल किंवा त्यांच्या पॅन क्रमांकाचा समावेश विशेष श्रेणीत केला जाईल. गेल्या वर्षी आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदींनी याचा उल्लेख केला होता. सरकारी सेवांमध्ये सुधारणा व्हायला हव्यात, असं मत मोदींनी त्यावेळी व्यक्त केलं होतं. याशिवाय प्रामाणिक करदात्यांना विविध सेवा आणि सुविधांमध्ये प्राधान्य देण्याचा विचारदेखील पंतप्रधानांनी मांडला होता.