सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:37 IST2025-08-22T11:36:03+5:302025-08-22T11:37:22+5:30
दिल्लीत एका महिलेसह दरोडेखोरांच्या टोळीने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाच्या कार्यालयातून सुमारे २.३ कोटी रुपये पळवल्याचा प्रकार समोर आला.

सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
दिल्लीतील विवेक विहारमध्ये एका महिलेसह दरोडेखोरांच्या टोळीने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाच्या कार्यालयातून सुमारे २.३ कोटी रुपये पळवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तोतया अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
तक्रारदार मनप्रीत हा गाझियाबादमधील इंदिरापुरमचा रहिवासी असून तो व्यावसायिक आहे. त्याने विवेक विहारमधील इमारतीत सुमारे २.५ कोटी रुपयांची व्यवसायिक कमाई ठेवली होती. १९ ऑगस्ट रोजी त्याने त्याचा मित्र रविशंकर याला तिथून १.१० कोटी रुपये त्याच्या निवासस्थानी आणण्यास सांगितले. तितक्यात गाडीतून उतरलेल्या लोकांनी स्वतःची ओळख सीबीआय अधिकारी म्हणून करून दिली, ज्यात एका महिलेसह चार जणांचा समावेश आहे. त्यांनी शंकरला थांबवले आणि त्याच्याकडून बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांनी शंकरला मनप्रीतच्या कार्यलयात घेऊन जाण्यास भाग पाडले आणि तिथे कर्मचाऱ्यांना मारहाण करून उर्वरित रोकड लुटली.
याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. त्यांची ओळख पटली असून पापोरी बरुआ (वय, ३१) आणि दीपक (वय, ३२) अशी त्यांची नावे आहेत. पापोरी आसामची रहिवासी आहे आणि दीपक मूळचा तुघलकाबादचा आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.