CoronaVirus News: वयोवृद्धांवर सहा राज्यांत होणार बीसीजीच्या चाचण्या; मुंबईतील केईएममध्येही होणार प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 22:20 IST2020-07-19T22:19:09+5:302020-07-19T22:20:26+5:30
शास्त्रज्ञांच्या पथकांचे नेतृत्व चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युयुबरक्यूलॉसिस (एनआयआरटी) ही संस्था करणार आहे.

CoronaVirus News: वयोवृद्धांवर सहा राज्यांत होणार बीसीजीच्या चाचण्या; मुंबईतील केईएममध्येही होणार प्रयोग
नवी दिल्ली : क्षयरोगावर देण्यात येणारी बीसीजीची लस कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरते का, याची पडताळणी करण्यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था ६० ते ९५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठांवर चाचण्या करणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील केईएम रुग्णालयात तसेच तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान व दिल्लीमध्ये या चाचण्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या चाचण्या करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकांचे नेतृत्व चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युयुबरक्यूलॉसिस (एनआयआरटी) ही संस्था करणार आहे. चेन्नई महानगरपालिका व तामिळनाडूचे आरोग्य खाते यांच्या सहकार्याने आयसीएमआर या राज्यात काही ठिकाणी चाचण्या करणार आहे. क्षयाला प्रतिबंध करणारी बीसीजी लस कोरोना विषाणूचा संसर्गही रोखू शकते का? यावर गेले काही महिने संशोधकांच्या वतुर्ळात चर्चा सुरू आहे. क्षय होऊ नये म्हणून नवजात बालकाला बीसीजीची लस टोचली जाते. देशातील राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा तो एक भागच बनला आहे.
एनआयआरटीचे संचालक डॉ. सुभाष बाबू यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग बीसीजी लसीने रोखता येतो का? याबद्दल जगातील काही देशांत माणसांवर सध्या प्रयोग सुरू आहेत. आता भारतातही असे प्रयोग होणार आहेत. बीसीजी लसीमुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला, तर वयोवृद्ध लोकांना रुग्णालयात दाखल करण्याच्या, वेळप्रसंगी अतिदक्षता विभागात हलविण्याच्या घटनांत घट होऊ शकेल.
या संस्थांमध्ये होणार संशोधन...
वयोवृद्धांना होणारा कोरोनाचा संसर्ग बरा करण्यासाठी बीसीजी लस किती उपयुक्त ठरते, याबद्दलचे प्रयोग गुजरातच्या अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ आॅक्युपेशनल हेल्थ, मध्यप्रदेशमध्ये भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हॉयरमेंटल हेल्थ, जोधपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इम्पिमेंटेशन रिसर्च आॅन नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस व दिल्लीतील एम्समध्येही होणार आहेत.