'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:24 IST2025-08-01T17:23:59+5:302025-08-01T17:24:58+5:30
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. राहुल गांधींनी गंभीर आरोप आयोगावर केले, त्यावर आयोगाने भूमिका मांडली आहे.

'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
बिहारमधील मतदार यादी पडताळणीवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगच मतांची चोरी करत आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मौन सोडत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"मतांची चोरी केली जात आहे. आमच्याकडे ठोस पुरावा आहे की, निवडणूक आयोगच मतांच्या चोरीमध्ये सहभागी आहे. मी हे मस्करीत बोलत नाहीये. मी हे शंभर टक्के पुराव्यानिशी बोलत आहे", असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. त्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापला.
राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असताना आता निवडणूक आयोगाने यावर उत्तर दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "दररोज केल्या जात असलेल्या निराधार आरोपांकडे आयोग दुर्लक्ष करतो. दररोज धमक्या दिल्या जात असतानाही निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करत असलेल्या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी अशा बेजबाबदार विधानांकडे लक्ष देऊ नये."
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप बेजबाबदार आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर निवडणूक कर्मचाऱ्यांनी दररोज होत असलेल्या या आरोपांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहनही केले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. मतदार यांद्यामध्ये बोगस मतदार आढळून आल्यानंतर आयोगाने मतदार यादी पुर्नपरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून शंका व्यक्त करत आरोप केले जात असून, आता राहुल गांधींनी थेट मतांची चोरी होत असून, निवडणूक आयोगच त्यात भागीदार असल्याचे म्हटले आहे.