प्रेमाचं 'नेटवर्क' लई स्ट्राँग बुवा! फेरीवाल्याचं इंजिनिअर मुलीवर जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं तुम्हीच पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 15:45 IST2021-09-07T15:42:29+5:302021-09-07T15:45:21+5:30
प्रेमात माणूस काय करेल काही सांगता येत नाही. हल्ली आपल्या प्रेमाला मान्यता मिळवण्यासाठी किंवा प्रेयसीला मनवण्यासाठी 'शोले' स्टाईल नौटंकी करण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसतंय.

प्रेमाचं 'नेटवर्क' लई स्ट्राँग बुवा! फेरीवाल्याचं इंजिनिअर मुलीवर जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं तुम्हीच पाहा...
प्रेमात माणूस काय करेल काही सांगता येत नाही. हल्ली आपल्या प्रेमाला मान्यता मिळवण्यासाठी किंवा प्रेयसीला मनवण्यासाठी 'शोले' स्टाईल नौटंकी करण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसतंय. बरेलीतील एका फेरीवाल्यानंही आपल्या प्रेयसीसाठी असंच काहीसं केलंय. प्रेयसीसाठी एक फेरीवाला चक्क शोले चित्रपटातील वीरू बनला आणि मोबाइल टॉवरवर चढला. प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याचा हट्टापायी त्यानं असं केलं. टॉवरवर चढल्यानंतर वारंवार त्यानं आपल्या प्रेयसीशी बोलणं करुन द्या अशी मागणी केली. बराच वेळ सुरू असलेल्या या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कसंबसं तरुणाची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात आलं.
पोलिसांनी तरुणाचं समुपदेशन केलं आणि सारी कहाणी जाणून घेतली. तर गोष्ट अशीय की मोबाइल टॉवरवर चढलेला युवकाचं एका तरुणीवर प्रेम जडलं. पण ज्या मुलीवर प्रेम जडलं ती निघाली बिटेक उत्तीर्ण इंजिनिअर आणि आपले प्रेमवीर भाऊ आहे फेरीवाला. एक छोटी हातगाडी घेऊन यांचं दिवसाचं काम सुरू होतं. याच परिसरातून येता जाता त्याला संबंधित तरुणी दिसायची आणि ह्यो पठ्ठ्या तिच्या प्रेमात पडला. मग काय पठ्ठ्या ऐकतोय व्हंय. तरुणीकडून प्रेमाची कबुली मिळवण्यासाठी थेट मोबाइलचा उंच टॉवर गाठला.
हळूहळू परिसरात बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि गहजब झाला. घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच तेही याठिकाणी पोहोचले. बराच वेळ पोलिसांनी तरुणाला समजावलं. त्याला खाली उतरण्याचं आवाहन केलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर तरुण खाली उतरण्यास तयार झाला. पण यासाठी पोलिसांनाही युक्ती वापरावी लागली. पागल प्रेमी काही केल्या ऐकणार नाही हे लक्षात येताच पोलिसांनी संबंधित तरुणीसोबत लग्न लावून देऊ असं आश्वासन दिलं आणि कसंबसं त्याला खाली उतरण्यास प्रवृत्त केलं. पोलिसांना यात यशही आलं आणि अखेरीस त्याला अटक करण्यात आली. तरुणाच्या पालकांना बोलावण्यात आलं तर कळलं की त्याचे वडील देखील मुलाच्या कारनाम्यांमुळे आधीच वैतागलेले आहेत.