सिंगापूरच्या नोकरीच्या नादात बँक खाते साफ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 06:08 IST2024-12-24T06:08:23+5:302024-12-24T06:08:23+5:30
पुरेसा पगार मिळत नसल्याने जास्तीच्या पगारासाठी ते परदेशात नोकरीचा शोध घेत होते.

सिंगापूरच्या नोकरीच्या नादात बँक खाते साफ !
मुंबई : सिंगापूरच्या नोकरीच्या नादात मुंबईत काम करणाऱ्या इंजिनिअरचे बँक खाते रिकामे झाले आहे. यात तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक झाली असून सांताक्रूझ पोलिस अधिक तपास करत आहे.
सांताक्रूझ परिसरात राहणारे तक्रारदार श्रवण (४७) हे मूळचे आंध्रप्रदेशचे रहिवासी आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून सांताक्रूझमधील एका कंपनीत नोकरी करतात. पुरेसा पगार मिळत नसल्याने जास्तीच्या पगारासाठी ते परदेशात नोकरीचा शोध घेत होते. एका ऑनलाईन संकेतस्थळावर त्यांनी बायोडाटा अपलोड केला. १८ तारखेला दुपारच्या सुमारास त्यांना एकाने कॉल करून संबंधित संकेतस्थळावरून बोलत असल्याचे सांगितले. तसेच सिंगापूरच्या एका बड्या कंपनीत जॉब ऑफर केली. सुरुवातीला नोंदणीसाठी अडीच हजार, कागदपत्रे पडताळणीसाठी ७ हजार २९० रुपये पाठविण्यास सांगितले. श्रवणनेही विश्वास ठेवून पैसे भरले. भरलेल्या पैशांचे बिलदेखील व्हॉट्सॲप केल्याने त्यांचा विश्वास बसला. पुढे, वेगवेगळी कारणे पुढे करत ९ लाख ९९ हजार ३३३ रुपये भरण्यास भाग पाडले.
एवढे पैसे भरून देखील व्हिसासाठी आणखीन पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत पाठविण्यास सांगताच आरोपीने फोन बंद केले.
महिनाभरात १५ व्यवहार
अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी २० डिसेंबर रोजी १९३० या सायबर हेल्पलाईनवर कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. महिनाभरात १५ व्यवहारात एवढ्या रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. अखेर रविवारी याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिस पुढील तपास करत आहे.