आजारी आईच्या औषधांसाठी बांग्लादेशी युवकानं सीमा ओलांडली; BSF जवानांनी दाखवली माणुसकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:50 IST2021-09-29T17:48:36+5:302021-09-29T17:50:50+5:30
या युवकाचं नाव मिथुन मंडल असं आहे तो ३० वर्षाचा आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरब मंडल आहे. जे चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावात राहायला होते.

आजारी आईच्या औषधांसाठी बांग्लादेशी युवकानं सीमा ओलांडली; BSF जवानांनी दाखवली माणुसकी
सीमा सुरक्षा दलात अव्वल असणाऱ्या बीएसएफ(BSF) च्या जवानांनी माणुसकी आणि सद्भावनेचं नातं निभावल्याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालं आहे. सीमा सुरक्षा दलाने २८ सप्टेंबर रोजी दुपारी महाखोला बटालियनच्या नदिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात जवानांनी एका बांग्लादेशी युवकाला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात प्रवेश करताना पकडलं आहे. परंतु तपासावेळी हा युवक आईच्या औषधांसाठी बांग्लादेशची सीमा ओलांडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर BSF नं बीजीबी(बोर्डर गार्ड बांग्लादेश) ला हा युवक सोपवला.
या युवकाचं नाव मिथुन मंडल असं आहे तो ३० वर्षाचा आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरब मंडल आहे. जे चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावात राहायला होते. बीएसएफ जवानांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला की, त्याची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी इन्हेलर खरेदी करण्यासाठी त्याने बोर्डर पार करून भारतात प्रवेश केला. अटक झाल्यानंतर मिथुन मंडलने हात जोडून माफी मागत सांगितले की, माझी आई ह्दय आणि दमाच्या आजाराने त्रस्त आहे. तिला श्वास घेण्यास अडचण येते. तिच्यासाठी इन्हेलर आणायचं होतं. त्यासाठी त्याने भारतात प्रवेश केला.
बांग्लादेशी युवकाच्या अटकेनंतर बीएसएफ जवानांनी माणुसकी दाखवत त्याला बांग्लादेशी सैन्याच्या ताब्यात दिलं. हा परिसर बांग्लादेश आणि भारत सीमेवर लागून आहे. या परिसरातून अनेकदा घुसखोरीचा त्रास भारताला सहन करावा लागतो. त्यामुळे इथं प्रत्येक दिवशी कित्येक घुसखोरांना अटक करतात. अलीकडेच बोर्डर सिक्युरिटी फोर्सनं या परिसरात गस्त वाढवली आहे. बीएसएफचे जवान वारंवार सीमेवर करडी नजर ठेऊन असतात.
सीमेवर तैनात BSF चे जवान
सीमेजवळीस मुख्यालयातील दक्षिण बंगालचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, भारत-बांग्लादेश सीमेवरून घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ जवान कठोर पाऊलं उचलत आहे. ज्यामुळे घुसखोरी करणाऱ्यांना चाप बसला आहे. त्यातील काही घुसखोरांना कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर काही बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या गुन्ह्याची गंभीरता पाहून माणुसकीच्या नात्याने दोन्ही देशांचे सुरक्षा दल एकमेकांशी संवाद साधून सैन्याच्या ताब्यात दिलं जातं.