भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 22:59 IST2025-12-22T22:59:43+5:302025-12-22T22:59:59+5:30
India-Bangladesh Relation: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, नवी दिल्ली येथील बांगलादेशच्या हाय कमिशनने सोमवारी कौन्सुलर आणि व्हिसा सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.

भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, नवी दिल्ली येथील बांगलादेशच्या हाय कमिशनने सोमवारी कौन्सुलर आणि व्हिसा सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. बांगलादेशमधील विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने हे पाऊल उचललं आहे.
याबाबत बांगलादेशच्या हाय कमिशनने माहिती देताना सांगितले की, काही अपरिहार्य कारणांमुळे नवी दिल्ली येथील मिशन येथून सर्व कौन्सुलर सेवा आणि व्हिसा सेवा पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांना होत असलेल्या असुविधेसाठी आम्ही दिलगिली व्यक्त करतो.
बांगलादेशने उचललेल्या या पावलाच्या एक दिवस आधी भारताने बांगलादेशमधील प्रमुख शहर असलेल्या चितगाव येथील भारतीय व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरमधील व्हिसा सेवा पुढील आदेशांपर्यंत स्थगित केल्या होत्या. शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने हा निर्णय घेतला होता. शरीफ उस्मान हादी हा शेख हसिना यांना सत्तेवरून हटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आंदोलनातील प्रमुख चेहरा होता. हादीच्या मृत्यूनंतर चितगावमधील भारतीय सहाय्यक उच्चायोगाच्या बाहेर हजारोंच्या संख्येने जमाव गोळा झाला होता.