बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:00 IST2025-12-30T08:58:57+5:302025-12-30T09:00:37+5:30
India Bangladesh Tension: भारत-बांगलादेश संबंधांत तणाव वाढला! बांगलादेशने भारतातील आपले उच्चायुक्त रियाझ हमिदुल्लाह यांना तातडीने ढाका येथे पाचारण केले आहे.

बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या एका नाजूक वळणावर असल्याचे दिसत आहे. बांगलादेश सरकारने भारतातील आपले उच्चायुक्त रियाझ हमिदुल्लाह यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. या 'अर्जंट कॉल'मुळे दोन्ही देशांमधील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने रियाझ हमिदुल्लाह यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीने ढाका येथे पाचारण केले. हे आदेश इतके तातडीचे होते की, हमिदुल्लाह यांना अवघ्या काही तासांतच दिल्ली सोडावी लागली. ते सोमवारी रात्रीच ढाका येथे पोहोचले आहेत. सामान्यतः जेव्हा एखाद्या देशाच्या दूताला 'अर्जंट' बोलावले जाते, तेव्हा त्याचा अर्थ काहीतरी मोठा धोरणात्मक निर्णय किंवा निषेध व्यक्त करणे असा असतो. हमिदुल्लाह यांना परत बोलावणे, हा भारतासाठी एक 'राजनैतिक संदेश' दिला जात असल्याचे मानले जात आहे.
तणावाचे मुख्य कारण काय असू शकते?
इस्कॉन मंदिर आणि चिन्मय कृष्ण दास प्रकरण: गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि इस्कॉनशी संबंधित चिन्मय कृष्ण दास यांची अटक, यामुळे भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आगरतळा येथील घटनेचा निषेध: आगरतळा येथील बांगलादेश उप-उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्यानंतर बांगलादेशने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
शेख हसीना यांचे वास्तव्य: माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयाला असल्यामुळे बांगलादेशातील अंतरिम सरकार भारतावर नाराज असल्याचे बोलले जाते.