ओदिशामधील बालासोर येथे असलेल्या एफएम कॉलेडमधील एका विद्यार्थिनीने आत्मदहन करून जीवन संपवल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणातील पीडितेने केलेले आरोप खोटे असून, तिला निलंबित करण्यात यावं, अशी मागणी करणारं ७१ विद्यार्थ्यांच्या सह्या असलेलं पत्र कॉलेजच्या प्राचार्यांना देण्यात आलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.
या संदर्भातील वृत्त आज तक ने प्रसारित केलं आहे. या वृत्तानुसार हे पत्र पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुहाने पीडिता विद्यार्थिनी आणि तिच्या समर्थकांना निलंबित करण्याची मागणी केली होती. सोबतच या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या कामकाजावर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला हातो. दरम्यान, पीडितेच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या या कागदपत्रांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या ७१ विद्यार्थ्यांना एकत्र आणून हे पत्र लिहिण्यामागे कुणाचा हात होता. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी नियोजनबद्ध कटकारस्थान रचण्यात आले होते का? अशी विचारणा होत आहे.
दरम्यान, पीडितेच्या एका निकटवर्तीय मैत्रिणीने गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, विद्यार्थी संघटनांच्या काही सदस्यांनी पीडितेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला होता. तिने जेव्हा फॅकल्टी मेंबरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला तेव्हा त्यांनी या विद्यार्थिनीवर दबाव आणला होता. तसेच विद्यार्थी राजकारणाच्या या विषारी वातारवणात सोशल मीडियावर पीडितेच्या चारित्र्य हननाची मोहीमही चालवली गेली, असा दावा तिने केला.
कुटुंबीयांकडून आधी न्यायाची मागणी केली जात होती. मात्र आता जो काही गौप्यस्फोट झाला आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला राजकीय कटकारस्थानाचं रूप मिळालं आहे. तसेच कॉलेजमधील विद्यार्थी संघटनांच्या राजकारणातील स्पर्धा आणि गटबाजीमुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.