“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 23:31 IST2023-05-06T23:31:26+5:302023-05-06T23:31:54+5:30
शिवराज सिंह चौहान यांचा काँग्रेसवर निशाणा.

“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न”
मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडोअरनंतर ओंकारेश्वरमध्ये एकात्म धाम तयार होत आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान स्वतः या प्रकल्पाचं काम पुढे नेत आहेत. मध्य प्रदेशमध्ये एकात्म धामपासून पीएफआय, बजरंग दल आणि द केरळ स्टोरी यांना करमुक्त करण्याच्या मुद्द्यावर शिवराज सिंह चौहान यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं.
“लोकांची मतं निरनिराळी असतात. सर्वांना न्याय, कोणाचंही तुष्टीकरण होऊ नये हे भाजप सरकारचं धोरण आहे. आम्ही लोभ, धन कोणतीही प्रलोभनं देऊन धर्मांतरण करेल तर तो गुन्हा असेल. यासाठीच कायदा तयार केला आहे. याशिवाय सर्वांना मोफत रेशन दिलं जात आहे. घरं बनवली जात आहे. यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही,” असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. शनिवारी मुख्यमंत्री शिवराज यांनी आजतकशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. जर कोणी दहशतवाद पसरवण्याचं काम केलं किंवा सिमी नेटवर्क बनलं तर ते नष्ट करण्याचं आमचं काम असेल, असंही ते म्हणाले.
चुकीचे विचार बदलण्याचं काम
“एकेकाळी हिंदू शब्द बोलणं संकुचित विचारसरणीप्रमाणे मानलं जायचं. आम्हीच धर्मनिरपेक्षा आहोत याची विरोधी पक्षांमध्ये स्पर्धा लागत होती. आपली संस्कृती, जीवन मूल्ये, महापुरूषांची नावं घेणं पाप आहे का? हे चुकीचे विचार होते. चुकीचे विचार बदलणं चुकीचं आहे का? बजरंग दलावर बंदी का?” असं चौहान बजरंग दलावरील बंदीबाबत म्हणाले.
एकीकडे दहशवादी घटना करणारी पीएफआय संघटना आणि दुसरीकडे बजरंग बलीची भक्ती करणाऱ्या देशभक्तांची संघटना आहे. तुम्ही बजरंग दलावर बंदी घालून मतं मिळवू इच्छित आहात. केवळ मतांचं राजकारण सुरू आहे. बजरंगबलीचं नाव घेणं पाप आहे का? कोट्यवधी लोक बजरंगबलीचे भक्त आहेत. ते मतांचं राजकारण होऊ देणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.