उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्राध्यापकाच्या भुलथापांना बळी पडत काही विद्यार्थीनी त्या प्राध्यापकाला नको ते देऊन बसल्या आहेत. या विद्यार्थिनींचे लैगिक शोषण केल्याप्रकरणी आता त्याला नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली असून ही समिती चौकशी करत आहे.
बागला डिग्री कॉलेजमधील हा प्रकार आहे. पोलिसही या प्रकरणाच्या चौकशीला लागले असून कॉलेजचा स्टाफ आणि प्राचार्यांची चौकशी केली जात आहे.
पीसी बागला डिग्री कॉलेजचे भुगोल विभागाचे एचओडी डॉ. रजनीश याच्याविरोधात विद्यार्थिनींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात शहरातील एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती. यावर कारवाई करताना जिल्हाधिकाऱ्यांनी चार सदस्यांची समिती स्थापन केली. तसेच पोलिसांत याची तक्रार केली.
रजनीश याने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले आहे. याचे ५९ व्हिडीओ आणि फोटो आहेत. या व्हिडीओ, फोटोमध्ये ज्या मुली दिसत आहेत त्यांचे चेहरे कॉलेजच्या विद्यार्थिनींशी मॅच केले जात आहेत, त्यांना संपर्क केला जात आहे. अनेक पीडित मुली या लाजेखातर चुप आहेत. यापैकी काही कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. या नराधम प्राध्यापकाने आपल्याच मोबाईलमध्ये हे व्हिडीओ आणि फोटो रेकॉ़र्ड केले होते. यापैकी काही व्हिडीओ अश्लिल वेबसाईटवर अपलोड केले होते, यामुळे याचा भांडाफोड झाला आहे.
प्राध्यापक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चांगले मार्क देणे आणि सरकारी नोकरी लावण्याच्या भुलथापा देऊन त्याने या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले होते. धक्कादायक बाब म्हणजे मोठ्या संख्येने विद्यार्थीनी या त्याच्या आमिषाला भुलल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.