राममंदिर खटल्यात या 92 वर्षीय वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वपूर्ण, जाणून घ्या त्यांच्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 10:03 IST2019-11-10T09:59:09+5:302019-11-10T10:03:46+5:30
अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

राममंदिर खटल्यात या 92 वर्षीय वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वपूर्ण, जाणून घ्या त्यांच्याविषयी
नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालानुसार अयोध्येतील वादग्रस्त भूमी ही रामजन्मभूमी असल्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन राम मंदिरासाठी दिली. तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीचे बांधकाम करण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या खटल्याचा निकाल लागल्यानंतर राममंदिर आणि रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या एका 92 वर्षीय वकिलांचे छायाचित्र काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या ज्येष्ठ विधिज्ञांचे नाव के. परासन असून, त्यांनी तब्बल 40 वर्षे राम मंदिराच्या बाजूने भक्कम युक्तिवाद करत या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
माजी अॅटॉर्नी जनरल म्हणून काम पाहिलेल्या परासन यांनी राम मंदिर खटल्यामध्ये दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईत हिंदू पक्षाचे वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी या खटल्यासाठी शास्र, पुराणे तसेच पुरातत्व खात्याने दिलेल्या दस्तऐवज यांचा अभ्यास करून सुनावणीदरम्यान प्रभावी युक्तिवाद केला. परासरन हे या खटल्यामध्ये एवढे गुंतले होते की त्यांना अयोध्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण तारखा मुखोदगत आहेत. रामजन्मभूमीबाबत 40 दिवस सलग चाललेल्या सुनावणीवेळी परासरन यांनी विरोधी पक्षाचे वकील राजीव धवन यांच्या आक्रमक युक्तिवादाचा अत्यंत शांतपणे सामना केला. तसेच परासरन हे गंभीर वातावरणातही आपल्या युक्तिवादावर ठाम राहिले.
92 वर्षीय परासरन यांनी वयाचा अडसर बाजूल ठेवत सलग चाललेल्या सुनावणीत आपला पक्ष प्रभावीपणे मांडला. त्यांनी या खटल्यातील प्रत्येक पैलूचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून आपली बाजू स्पष्ट केली. त्यांच्या टीममध्ये पी.व्ही. योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोट्टाराजू, आदिती दानी, अश्विन कुमार डीएस आणि भक्तिवर्धन सिंह यांचा समावेश होता.
9 ऑक्टोबर 1927 रोजी जन्मलेल्या परासरन हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सभासद राहिले आहेत. तसेच 1983 ते 1989 या काळात त्यांनी देशाचे अॅटॉर्नी जनरल म्हणून काम पाहिले होते. त्यांना आतापर्यंत पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.