अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 05:44 IST2023-12-30T05:43:32+5:302023-12-30T05:44:32+5:30
शहरात कडेकोट सुरक्षा

अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी अयोध्या सज्ज झाली असून, शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराला ‘भव्यदिव्य’ रूप देण्यासाठी फुलांनी सजविले जात आहे. पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने विकसित केलेल्या रेल्वेस्थानकाचे व आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. या विमानतळाला महर्षी वाल्मीकी यांचे नाव देण्यात येणार आहे.
पंतप्रधान शनिवारी सकाळी १०:४५ च्या सुमारास अयोध्या विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते दोन नवीन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
३०० क्विंटल फुलांनी सजली श्रीरामनगरी
देशाच्या विविध भागांतून आलेले अनेक कामगार रामकथा उद्यानात फुलांनी कलात्मक रचना तयार करीत आहेत. या रचना भगवान राम, त्यांचा धनुष्यबाण, भगवान हनुमान आदींच्या प्रतिमांनी प्रेरित आहे. त्यासाठी ३०० क्विंटल फुले मागविली आहेत.
विमानतळ श्रीराममय
अयाेध्येतील विमानतळ टर्मिनलची इमारत तिरंग्याच्या संकल्पनेवर सजविली आहे. विमानतळाला अयोध्या स्थानकाच्या नवीन इमारतीप्रमाणे पारंपरिक स्वरूप देण्यात आले आहे. इमारतीचा दर्शनी भाग श्रीराम मंदिराची वास्तुकला प्रतिबिंबित करतो. टर्मिनल इमारतीच्या आतील भागात भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी चित्रे व भित्तीचित्रे लावण्यात आली आहेत. याशिवाय एक भिंत महाबली हनुमानाला समर्पित आहे. त्यावर हनुमानाशी संबंधित घटना चित्रित करण्यात आल्या आहेत.