अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना 'ब्रेन स्ट्रोक'; प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:00 IST2025-02-03T13:57:54+5:302025-02-03T14:00:30+5:30
महंत यांना ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती

अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना 'ब्रेन स्ट्रोक'; प्रकृती गंभीर
Mahant Satyedra Das Health, Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना ब्रेन स्ट्रोक म्हणजेच मेंदुचा गंभीर आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र दास यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महंत सत्येंद्र दास हे ८५ वर्षांचे असून रविवारी ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सोमवारी सांगितले.
"श्री सत्येंद्र दास जी यांना स्ट्रोक आला. त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास आहे. रविवारी त्यांना SGPGI रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते न्युरोलॉजी विभागातील हाय डिपेन्डन्सी युनिट (अतिदक्षता विभाग) मध्ये आहेत," अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिली. पुढे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, "त्यांची प्रकृती नाजूक असली तरीही ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांना सर्व अवयव सध्या नीट कार्यरत आहेत. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या उपचारावर आमचे बारीक लक्ष आहे."
आचार्य सत्येंद्र दास यांच्याबद्दल...
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत रामजन्मभूमी संकुलात रामललाची सेवा करत होते. त्यांनी छोटाशा झोपडीवजा मंडपात राहून २८ वर्षे रामललाची पूजा केली. यानंतर, त्यांनी सुमारे चार वर्षे तात्पुरत्या मंदिरात मुख्य पुजारी म्हणून रामललाची सेवा केली. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ते मुख्य पुजारी म्हणून कार्यरत आहेत. तब्येत आणि वाढत्या वयामुळे त्यांच्यावर मंदिरात उपस्थित राहण्यासंबंधी कुठल्याही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यांना हवे तेव्हा ते मंदिरात येऊन सेवा करू शकतात.