औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण पोहोचलं संयुक्त राष्ट्रात, मुघलांच्या वारसांनी पत्र लिहून केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:31 IST2025-04-16T12:30:27+5:302025-04-16T12:31:14+5:30
Aurangzeb Tomb: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरून मागच्या काही दिवसांमध्ये मोठा वाद झाला होता. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्रांकडे पोहोचला आहे.

औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण पोहोचलं संयुक्त राष्ट्रात, मुघलांच्या वारसांनी पत्र लिहून केली अशी मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरून मागच्या काही दिवसांमध्ये मोठा वाद झाला होता. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्रांकडे पोहोचला आहे.
अखेरचा मुघल बादशाह बहादूरशाह जफर याचे वंशज याकूब हबीबुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून मुघल बादशाहा औरंगजेब याच्या कबरीच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात औरंगजेब बादशाहची करब हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये तणाव निर्माण होऊन हिंसाचार झाला होता. तसेच या घटनेनंतर महिनाभरात हा विषय संयुक्त राष्ट्रांसमोर पोहोचला आहे. औरंगजेब बादशाहाची ही कबर वक्फची संपत्ती असून, प्रिंस याकूब हे तिचे मुतवल्ली (विश्वस्त) आहेत. याबाबत प्रिंस याकूब यांनी सांगितले की, औरंगजेबाची ही कबर राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित झालेली आहे. तसेच तिला प्राचीन स्मारके, पुरातात्त्विक ठिकाण आणि अवशेष अधिनियम १९५८ अन्वये संरक्षण प्राप्त आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार या अधिनियमातील तरतुदींनुसार संरक्षित स्मारकाच्या जवळपास कुठल्याही प्रकराचं अनधिकृत बांधकाम, बदल, खोदकाम आदी करता येत नाही. अशा कुठल्याही कृतीला बेकायदेशीर आणि दंडात्मक मानलं जातं, असे ते म्हणाले. तसेच या कबरीच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षत तैनात करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.