"जोशी, जाधव बोल रहा हूं, भोला सर..."; मिराज २००० क्रॅश झाल्यानंतर पायलटचा ऑडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:40 IST2025-02-07T16:29:55+5:302025-02-07T16:40:21+5:30

मध्य प्रदेशात गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या राज-२००० हे दोन आसनी विमानानाचा अपघात झाला.

Audio of Indian Air Force pilot goes viral after Mirage 2000 crash | "जोशी, जाधव बोल रहा हूं, भोला सर..."; मिराज २००० क्रॅश झाल्यानंतर पायलटचा ऑडिओ व्हायरल

"जोशी, जाधव बोल रहा हूं, भोला सर..."; मिराज २००० क्रॅश झाल्यानंतर पायलटचा ऑडिओ व्हायरल

Fighter Jet Crash: हवाई दलाचे मिराज-२००० हे दोन आसनी विमान गुरुवारी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बहरेटा सानी गावाजवळ कोसळले. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. मिराज-२००० या लढाऊ विमानात दोन पायलट होते. अपघातापूर्वी दोन्ही पायलट विमानातून बाहेर पडले होते. त्यामुळे दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या अपघातानंतर जखमा झाल्याने विव्हळत असतानाही एका पायलटने गावकऱ्यांच्या फोनवरुन आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरुवारी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भारतीय हवाई दलाचे मिराज २००० लढाऊ विमान कोसळले. या अपघातात लढाऊ विमानाचे दोन्ही पायलट जखमी झाले आहेत. अपघातानंतर फायटर प्लेन जळतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. वायू दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान नियमित सराव करत असताना अपघात झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जात आहेत. मात्र यावेळी एका जखमी पायलटने त्याच्या सहकाऱ्यांशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अपघातानंतर पायलटने ग्वाल्हेर एअरबेसच्या अधिकाऱ्याशी एका गावकऱ्याच्या मोबाईलवरून संवाद साधला. "जोशी, जाधव बोल रहा हूं. मी विमानातून बाहेर आलो आहे. मी नदीच्या दक्षिणेला कुठेतरी आहे. माझे विमान क्रॅश झाले आहे. भोला सर माझ्यासोबत आहेत. मी तुम्हाला माझे कॉर्डिनेट पाठवीन. मी २५४२ इथं आहे. विमान जळत आहे आणि ते वरून दिसत आहे. भोला सर माझ्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहेत. मी बहुधा विमानाच्या पश्चिमेला आहे. भोला सर बहुधा विमानाच्या पूर्वेला असावेत," असे पायलटने अधिकाऱ्याला फोनवर सांगितले.

त्यानंतर पायलट त्याच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना शांत राहण्यास सांगत होता जेणेकरून तो काय बोलतोय हे अधिकाऱ्यांना समजेल. अधिकाऱ्याशी बोलल्यानंतर पायलटने जवळच बसलेल्या एका गावकऱ्याला फोन दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी वैद्यकीय मदतीबाबत विचारले असता पायलटने रुग्णालयात नेण्यासाठी गाडी येत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर पायलटने गावकऱ्यांना त्याच्या दुसऱ्या पायलटचा शोध घेण्यास सांगितले.

दरम्यान, मिराज २००० या लढाऊ विमानाने ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. अपघातानंतर विमानातील दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले. पण त्यांना दुखापत झाली आणि त्यांना हेलिकॉप्टरने ग्वाल्हेरला नेण्यात आले.

Web Title: Audio of Indian Air Force pilot goes viral after Mirage 2000 crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.