Supreme Court News: आत्महत्या केलेल्या इंजिनिअर अतुल सुभाषच्या आईला सर्वोच्च न्यायालयात झटका बसला. अतुल सुभाषच्या मुलाचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, कोर्टाने मुलगा त्याच्या आईकडेच राहील असे स्पष्ट केले. कोर्टाने अतुल सुभाषच्या आईला यासंदर्भात कनिष्ठ न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अतुल सुभाषची आई अंजू देवा यांनी ४ वर्षाच्या नातवाचा (अतुल सुभाषचा मुलगा) ताबा मागितला होता. याचिकेत अतुल सुभाषच्या आईने म्हटले की, निकिता आणि तिच्या कुटुंबाने अतुलला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. पैसे मागून त्रास दिला. त्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागली. निकिता सिंघानियाकडे अतुलचा मुलगा सुरक्षित नाहीये.
न्यायमूर्ती नागरत्ना आणि न्यायमूर्ती साईश चंद्र शर्मा यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.
न्यायालयाने मागणी का फेटाळली?
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, "आम्हाला हे सांगता खेद वाटतोय, पण मुलासाठी याचिकाकर्ती (अतुलची आई) अनोळखी आहे. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मुलाला भेटू शकता. जर तुम्हाला मुलाचा ताबा हवा असेल, तर यासाठी वेगळी प्रक्रिया आहे", असे सांगत न्यायालयाने मागणी फेटाळून लावली.
अतुल सुभाषची पत्नी निकिता सिंघानियाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मुलगा हरयाणातील एका निवासी शाळेत शिकत आहे.
गेल्या वर्षी म्हणजे ९ डिसेंबर रोजी ३४ वर्षीय अतुल सुभाष याचा बंगळुरूतील मुन्नेकोलालू येथे राहत्या घरात मृतदेह आढळला होता. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह होता. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाषने तासभराचा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला होता. त्यात त्याने पत्नी आणि सासरच्या लोकांनी आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केलेला आहे.