सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:56 IST2024-12-06T08:56:33+5:302024-12-06T08:56:59+5:30
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब
नवी दिल्ली : काँग्रेससह विरोधी पक्ष विदेशी शक्ती, लोकांच्या माध्यमातून देशाची संसद, सरकार व अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गुरुवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. प्रश्नोत्तरादरम्यान दुबेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लक्ष्य केले. या आरोपानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे दोन वेळा काही तासांसाठी लोकसभेचे कामकाज स्थगित झाले. मात्र, दुपारी ३ नंतर लोकसभा दिवसभरासाठी तहकूब झाली. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाला.
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.
एनएसयूआयचे कार्यकर्ते ताब्यात
देशातील वाढती बेरोजगारी व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचार या मुद्द्यासह विविध मागण्यासाठी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआने संसदेच्या दिशेने गुरुवारी मोर्चा काढला.
मात्र, संसद परिसरात मोर्चा पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.
गोंधळ थांबेना
nसंसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांचे सभागृहातील वर्तन योग्य नसल्याचे स्पष्ट करत टीका केली. या गोंधळादरम्यान चर्चेला उत्तर देण्यासाठी पीठासीन सभापती दगदम्बिका पाल यांनी वैष्णव यांचे नाव पुकारले. त्यानंतर गोंधळ अधिकच वाढत गेला.
पाल यांनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ थांबत नसल्याने कामकाज तहकूब झाले.
खा. दुबेंनी माफी मागावी : काँग्रेस
विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे एका विदेशी गुंतवणूकदारासोबत संबंध जोडल्याबद्दल काँग्रेस पक्षाने भाजप खासदार निशिकांत दुबेंना लक्ष्य केले.
अदानी समूहाचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना बदनाम करण्याची जबाबदारी काही दलालांना दिली आहे. त्यामुळे दुबेंसारखे लोक गांधींवर टीका करत आहे.
दुबेंनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांकडे केली.
सदस्यांनी नियमांचे पालन करावे : बिर्ला
संसद सदस्यांनी सभागृहाच्या नियमांचे व प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
सभागृहात येताना कोणत्याही सदस्यांनी फलक घेऊन येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.