PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:06 IST2025-09-29T14:05:44+5:302025-09-29T14:06:13+5:30
...ही पोस्ट करताना, १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा कसा पराभव केला होता आणि त्यांच्या ९३,००० सैनिकांनी भारतासमोर कशा प्रकारे शरणागती पत्करली होती, हे ऐतिहासिक सत्य नकवींना माहीत नसावे...

PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा सलग तिसऱ्यांदा धुव्वा उडवत विजय साजरा केला. महत्वाचे म्हणजे, अंतिम सामन्यातील विजयानंतर, या स्पर्धेची ट्रॉफी पाकिस्तानचे गृहमंत्री तथा आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून स्वीकारण्यासही सघाने ठाम नकार दिला. मोहसिन नकवी बराच वेळ तेथे वाट बघत उभे होते. मात्र, भारतीय संघ ट्रॉफी घेण्यासाठी समोर आलाच नाही. अखेर अपमानित होऊन मोहसिन यांना तेथून निघून जावे लागले.
या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, “खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि निकाल तोच आहे - भारताचा विजय!” या ट्वीटने पाकिस्तानला जबरदस्त मिरची लागली आहे. संतप्त नकवींनी यावर प्रत्युत्तर देत, मोदींवर क्रीडा भावनेचा अपमान केल्याचा आरोप केला. नक्वी यांनी एक्सवर खोटे दावे करत म्हटले आहे की, 'जर युद्ध आपल्यासाठी अभिमानाचा विषय असेल तर, इतिहासात पाकिस्तानचा अनेक वेळा विजय झाला आहे. कुठलाही क्रिकेट सामना सत्य बदलू शकत नाही. खेळात युद्ध आणणे, हे आपण किती आधीर आहात हे दर्शवते."
मात्र, ही पोस्ट करताना, १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा कसा पराभव केला होता आणि त्यांच्या ९३,००० सैनिकांनी भारतासमोर कशा प्रकारे शरणागती पत्करली होती, हे ऐतिहासिक सत्य नकवींना माहीत नसावे. महत्वाचे म्हणजे, या युद्धाचे फोटोसह पुरावे आजही उपलब्ध आहेत.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीही मोदींच्या ट्वीटवर तीव्र आक्षेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळ भावने विरोधात जाऊन ट्वीट केले आहे. यामुळे आशिया खंडातील शांतता आणि स्थैर्यावर परिणाम होईल, असे म्हटले आहे.