"भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर लाठरने नाचायला हवं होतं, तो का मेला?"; काँग्रेस नेते उदित राज यांचा वादग्रस्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:00 IST2025-10-15T12:50:00+5:302025-10-15T13:00:33+5:30
हरियाणा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेत्याने केलेल्या टीकेने वातावरण तापलं आहे.

"भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर लाठरने नाचायला हवं होतं, तो का मेला?"; काँग्रेस नेते उदित राज यांचा वादग्रस्त सवाल
Haryana Police: हरयाणातील आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. वाय. पुरन कुमार यांनी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांवर आरोप करत आपलं जीवन संपवलं होतं. पुरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणावरून सोमवारी हरयाणा सरकारने पोलिस महासंचालक शत्रुजीत कपूर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. सरकारने याआधी रोहतकचे जिल्हा पोलिस प्रमुख नरेंद्र बिजारनिया यांचीही बदली केली. मात्र त्यानंतर पुरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत हरयाणा पोलिस दलातील संदीप कुमार या असिस्टंट सब-इन्स्पेक्टरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तत्पूर्वी लिहिलेल्या व्हिडिओ व चिठ्ठीत पुरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले.
आता हरियाणा पोलीस दलातील सहायक उपनिरीक्षक संदीप लाठर यांच्या आत्महत्येवरून काँग्रेस नेते उदित राज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पुरन कुमार यांच्या आत्महत्येच्या संदर्भात त्यांनी लाठर यांच्यावर टीका केली आहे. "जर आयपीएस वाय पूरन कुमार हे भ्रष्ट आणि संदीप लाठर यांना त्रास देणारे अधिकारी होते, तर त्यांच्या आत्महत्येनंतर संदीप लाठर यांनी आनंदोत्सव साजरा करायला हवा होता. उलट ते स्वतः का आत्महत्या करत आहेत? अशा परिस्थितीत तर संदीप लाठर यांनी आनंदी व्हायला पाहिजे होते, पण त्यांनी आत्महत्या केली," असं उदित राज म्हणाले.
याशिवाय, उदित राज यांनी हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. कपूर यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अवैध मालमत्ता जमा केल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. सध्या कपूर यांना रजेवर पाठवण्यात आले आहे.
आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनीही नुकतीच आत्महत्या केली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, तसेच त्यांना निलंबितही करण्यात आले होते. या दोन्ही पोलिसांच्या आत्महत्येच्या घटनांनी हरियाणा पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर आणि कथित भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. उदित राज यांनी या दोन्ही घटनांचा आधार घेत, हरियाणातील पोलीस दलातील अनियमिततांवर बोट ठेवले आहे आणि या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. उदित राज या वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.