Operation Sindoor Surgical Air Strike: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत असतानाच भारताने मंगळवारी मध्यरात्री दीडनंतर पाकिस्तानवर हल्लाबोल केला. भारताने सीमेवरून पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्रे डागली, असे पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ही क्षेपणास्त्रे पाकव्याप्त काश्मीर आणि देशाच्या पूर्व पंजाब प्रांतात डागण्यात आली. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर शहीद विनय नरवाल यांच्या आई आशा नरवाल यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.
केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले, भारताने बुधवारी पहाटे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना आम्ही प्रत्युतर देऊ. हल्ल्यानंतर मुझफ्फराबादमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला. बहावलपूरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पाकने ४८ तासांसाठी सर्व हवाई वाहतुकीसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी बदला घेतला ही सगळ्यांत चांगली गोष्ट
पंतप्रधान मोदी यांनी बदला घेतला ही सगळ्यांत चांगली गोष्ट आहे. आमचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे. मी सैन्याच्या जवानांना हाच संदेश देऊ इच्छिते की, तुम्ही पुढे जात राहा आणि असाच बदला घेत राहा. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी त्यांना असेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. ऑपरेशन सिंदूर केल्यामुळे मी खूप आनंदी आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली मिळाली आहे. त्यांना न्याय मिळाला आहे, असे आशा नरवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. या एअर स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यात 'ऑपरेशन सिंदूर'चा हेतू केवळ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करणे होते. शेजारील राष्ट्राशी लढण्याच्या हेतूने हल्ला नव्हता असे भारताने म्हटले आहे.