स्फोटात उडाल्या तब्बल ३२ गाड्यांच्या चिंधड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:15 IST2025-11-11T10:15:26+5:302025-11-11T10:15:36+5:30
Delhi Blast: दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या स्फोटाचे रहस्य उलगडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्र सरकारच्या तमाम संस्थाचे पथक घटनास्थळाची सखोल पाहणी करीत आहे. यात श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे.

स्फोटात उडाल्या तब्बल ३२ गाड्यांच्या चिंधड्या
- चंद्रशेखर बर्वे
लाल किल्ला (नवी दिल्ली) : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या स्फोटाचे रहस्य उलगडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्र सरकारच्या तमाम संस्थाचे पथक घटनास्थळाची सखोल पाहणी करीत आहे. यात श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे.
स्फोट एवढा जबरदस्त होता की, ६०-७० मीटरच्या परिसरात जी वाहने उभी होती त्या सर्वांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. कार, ऑटो रिक्षा, बॅटरी रिक्षा आणि टू व्हीलर अशा एकूण ३२ गाड्यांचे तुकडे तुकडे झाले. गाड्या एकीकडे आणि गाड्यांचे एक्सेल आणि टायर दुसरीकडे असे चित्र घटनास्थळी बघायला मिळाले. काही गाड्या जळून खाक झाल्या. फक्त लोखंडी सांगाडा रस्त्यावर दिसत होता. गाडीच्या काचा आणि सामान तसेच रक्ताचा सडा पडला होता.
हा स्फोट सीएनजीचा होता की बॉम्बचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, हा हल्ला पुलवामा हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सातत्याने मिळत होती. यानंतरही हा स्फोट थांबविण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्फोट झालेल्या कारचे तीन मालक बदलले
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला, तर वीसहून अधिक जखमी झाले. या स्फोटामुळे परिसरातील अनेक वाहने जळून खाक झाली. दरम्यान, या स्फोटात वापरलेल्या कारचा मालक मोहम्मद सलमान याला दिल्ली पोलिसांनी हरयाणातील गुरुग्राममधून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोट झालेली कार ह्युंदाई आय-२० असून त्यात तीन जण प्रवास करत होते. प्राथमिक तपासानुसार, स्फोटानंतर मृत आणि जखमी व्यक्तींच्या शरीरावर शिसे किंवा छर्रे आढळले नाहीत, जे साधारण बॉम्बस्फोटाच्या घटनेत असामान्य मानले जाते. त्यामुळे तपास यंत्रणा या घटनेचे सर्व पैलू तपासत आहे.
स्फोटावेळी गाडीत लोक बसले होते
सलमानने ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर गाडी पुन्हा अंबाला येथे विकण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिस आता या दोन्ही व्यवहारांतील व्यक्तींचा शोध घेत आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, स्फोटाच्या वेळी गाडीत काही लोक बसलेले होते.