अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:44 IST2025-01-02T07:43:22+5:302025-01-02T07:44:03+5:30
केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे.

अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : अख्खा उत्तर भारत थंडीमुळे गारठला असला तरी अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्राने देशाच्या राजधानीचा राजकीय पारा वाढविण्याचे काम केले आहे.
केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे.
केजरीवाल यांचे प्रश्न
- भाजपने भूतकाळात जे काही चुकीचे केले आहे, त्यास संघाचा पाठिंबा आहे काय?
- भाजपचे नेते खुलेआम पैसे वाटत आहेत. संघाचा पाठिंबा आहे काय?
- मतदारांची नावे यादीतून गाळली जात आहेत. हे योग्य आहे का?
- भाजप लोकशाही कमजोर करीत आहे, असे संघाला वाटत नाही काय?
संघापासून सेवेची भावना शिका : भाजप
केजरीवाल यांनी संघ प्रमुखांना पत्र लिहिण्याऐवजी संघाकडून देशसेवेची भावना शिकण्याचा सल्ला भाजपने दिला आहे. भागवत यांना पत्र लिहिण्यामागे केजरीवाल यांचा पब्लिसिटी स्टंट आहे.
‘सेवा भारती’ ही झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी काम करते. यामुळे केजरीवाल यांनी देशसेवा कशी करावी, हे संघाकडून शिकायला पाहिजे, अशा शब्दात राज्यसभेचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केजरीवालांवर हल्ला चढविला आहे.