केजरीवालांची खेळी! दिल्ली विधानसभेत आणला विश्वास मत प्रस्ताव; भाजपावर आमदार फोडल्याचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 16:59 IST2024-02-16T16:58:43+5:302024-02-16T16:59:04+5:30
केजरीवाल यांनी ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ मध्येही विश्वास मत प्रस्ताव आणला होता. यावेळी केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपावर केला होता.

केजरीवालांची खेळी! दिल्ली विधानसभेत आणला विश्वास मत प्रस्ताव; भाजपावर आमदार फोडल्याचे आरोप
दिल्लीत आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी वेगळीच खेळी खेळली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेत विश्वास प्रस्ताव मांडला आहे. काँग्रेसला एका जागेची ऑफर दिल्यानंतर आता केजरीवाल यांनी भाजपविरोधात विश्वास मताची चाल खेळली आहे.
केजरीवाल यांनी ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ मध्येही विश्वास मत प्रस्ताव आणला होता. यावेळी केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपावर केला होता. यानंतर भाजपाने आपवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तर दिल्ली पोलिसांनी केजरीवालांना नोटीस पाठवून याचे पुरावे मागितले होते.
केजरीवालांना ईडीने अनेक नोटीस पाठविल्या आहेत. परंतु ते ईडीसमोर हजर झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आपल्याकडे २ आमदारांनी याचा खुलासा केल्याचे म्हटले होते. 'माझ्याकडे दोन आमदार आले होते, त्यांनी मुख्यमंत्र्यांना अटक केली जाईल असे सांगितले होते. त्या लोकांनी २१ आमदारांना आपल्याकडे वळविले आहे. २५ कोटी रोख आणि भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या लोकांनी अनेक ठिकाणी ऑपरेशन लोटस केलेले आहे. माझ्या माहितीनुसार सर्व २१ आमदारांनी त्यांना नकार दिला आहे, असे केजरीवाल म्हणाले होते.
विश्वास मत प्रस्तावावर केजरीवालांनी याचा पुनरुच्चार करून अबकारी घोटाळा हा काही घोटाळा नाहीय. खोट्या केसखाली सरकार पाडण्याचे प्रयत्न आहेत. दिल्लीत ते आयुष्यात निवडणूक जिंकू शकत नाहीत, आमचा एकही आमदार फुटलेला नाही, असे केजरीवाल म्हणाले आहेत. दरम्यान, विश्वास मत प्रस्तावावर उद्या सभागृहात चर्चा होणार आहे.