CM अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; न्यायालयाचा जामीन देण्यास नकार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 18:17 IST2024-08-20T18:16:34+5:302024-08-20T18:17:17+5:30
Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही.

CM अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; न्यायालयाचा जामीन देण्यास नकार...
Arvind Kejriwal News: दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात कैद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सीबीआयशी संबंधित प्रकरणात केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टातील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी मंगळवारी(दि.20) केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ केली.
सीएम अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी केजरीवालांच्या कोठडीत वाढ केली. दरम्यान, सीबीआयने केजरीवालांविरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रावर येत्या 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार
ईडी प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला होता, परंतु सीबीआयने अटक केल्यामुळे त्यांची सुटका होऊ शकली नाही. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र, अटकेविरोधातील याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला नोटीस दिली. सुप्रीम कोर्टात सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 23 ऑगस्टला होणार आहे.
याचिका दिल्ली उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली
दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी सीएम केजरीवाल यांची याचिका 5 ऑगस्ट रोजी फेटाळली होती. उच्च न्यायालयानेही अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणत्याही योग्य कारणाशिवाय अटक झाली, असे म्हणता येणार नाही. जामीन अर्जाचा प्रश्न आहे, तुम्ही यासाठी ट्रायल कोर्टात जाण्यास मोकळे आहात. विशेष म्हणजे, याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे.