'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:06 IST2025-06-23T19:05:48+5:302025-06-23T19:06:18+5:30
Arvind Kejriwal: गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर निवडून जाणार असल्याची चर्चा सुरू होती.

'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेवर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लुधियाना पश्चिम विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आपनेआपले राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हा असा अंदाज लावला जात होता की, जर ते जिंकले तर अरविंद केजरीवाल त्यांच्या जागी राज्यसभेत जाऊ शकतात. सोमवारी लुधियाना पश्चिम जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आले आणि संजीव अरोरा विजयी झाले.
कुर्सी या कोई पद को ठुकराकर जनसेवा को चुनना ही केजरीवाल की असली पहचान रही है🔥 pic.twitter.com/E39ObR0Vdf
— AAP (@AamAadmiParty) June 23, 2025
या विजयानंतर अशी चर्चा सुरू झाली की, अरविंद केजरीवाल आता राज्यसभेवर जातील, मात्र त्यांनी स्वतः या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. मीडियाशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, 'राज्यसभेत कोण जाणार, हे पक्षाची राजकीय व्यवहार समिती ठरवेल, पण मी जात नाहीय,' अशी स्पष्टोक्ती केजरीवालांनी दिली. दरम्यान, केजरीवालांच्या नकारानंतर आता आम आदमी पक्ष कोणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
'आप'ने गुजरातचा गडही राखला
लुधियाना पश्चिमसह, 'आप'ने गुजरातमधील दोन विधानसभा जागांवर (विसावदर आणि काडी) पोटनिवडणुका लढवल्या. यातील विसावामधून 'आप'चे गोपाल इटालिया विजयी झाले. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 'आप'ने विसावदरची जागा जिंकली होती. मात्र, त्यांचे आमदार भूपेंद्र भयानी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे विसावदर जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे, गुजरातमध्ये भाजपला २००७ पासून विसावदरची जागा जिंकता आलेली नाही.