आपचे अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी राज्यात पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नवीन कार्यकर्त्यांना जोडणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. अहमदाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"गुजरातमध्ये भीतीचं वातावरण"
अरविंद केजरीवाल म्हणाले की, "भाजपाने गेल्या ३० वर्षांपासून गुजरातवर राज्य केलं आहे. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी त्यांनी ती अधिकच बिघडवली आहे. आज राज्यात सर्वत्र भीती आणि दहशतीचं वातावरण आहे. याच कारणामुळे लोक आता आम आदमी पार्टीकडे 'बदलाचा पर्याय' म्हणून पाहत आहेत."
"जनता आमच्याकडे येतेय"
टीका करताना केजरीवाल म्हणाले, "गेल्या ३० वर्षात भाजपाने गुजरातला दरीत ढकललं आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि भीती आहे. जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, त्यांना घाबरवलं आणि धमकावलं जाते. प्रसंगी तुरुंगात टाकलं जातं. भाजपा उघडपणे भ्रष्टाचार करत आहे आणि त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवू शकत नाही. अशा परिस्थितीत लोक मोठ्या आशेने 'आप'कडे बघत आहेत."
जनतेचा 'आप'वर विश्वास
केजरीवाल यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीबद्दल सांगितलं की, "गेल्या ६-७ महिन्यांपासून आम आदमी पार्टी संपूर्ण राज्यात रॅली काढत आहे. आमच्याकडे पैसे नाहीत, आमचा पक्ष गरीब आहे. मात्र लोक स्वतः पैसे खर्च करून आमच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. लोकांना आता काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. जनतेला आता भाजपाला सक्षम पर्याय म्हणून फक्त आम आदमी पार्टीच दिसत आहे."
मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य
अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावरूनही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, "इतक्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करूनही ते बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. यावरून हे स्पष्ट होतं की जनता त्यांच्या विरोधात आहे, पण भाजपा सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर करत आहे."
Web Summary : Arvind Kejriwal, on Gujarat tour, attacked BJP, alleging rampant corruption and fear. He claimed people see AAP as an alternative, disillusioned with BJP's 30-year rule and Congress's failures. He also criticized BJP's use of government machinery in elections.
Web Summary : गुजरात दौरे पर अरविंद केजरीवाल ने भाजपा पर भ्रष्टाचार और भय का आरोप लगाया। उन्होंने दावा किया कि लोग आप को विकल्प के रूप में देखते हैं, भाजपा के 30 साल के शासन और कांग्रेस की विफलताओं से मोहभंग हो गया है। उन्होंने चुनावों में भाजपा द्वारा सरकारी मशीनरी के उपयोग की भी आलोचना की।