दिल्ली निवडणुकीसाठी गुजरात पोलिसांची पथके तैनात; केजरीवालांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात,"तुम्हाला आमचचं नाव..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:15 IST2025-01-26T15:55:58+5:302025-01-26T16:15:39+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत गुजरात पोलीस तैनात केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

Arvind Kejriwal accuses Gujarat police of being deployed for Delhi assembly elections 2025 | दिल्ली निवडणुकीसाठी गुजरात पोलिसांची पथके तैनात; केजरीवालांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात,"तुम्हाला आमचचं नाव..."

दिल्ली निवडणुकीसाठी गुजरात पोलिसांची पथके तैनात; केजरीवालांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात,"तुम्हाला आमचचं नाव..."

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यावरुन आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आक्षेप घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने पंजाब पोलिसांना हटवून त्यांच्या जागी गुजरात पोलिसांचा समावेश केल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल यांनी आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांच्या या आरोपावर गुजरात सरकारने प्रत्युत्तर दिलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत ही माहिती दिली. "गुजरात पोलिसांचा हा आदेश वाचा. निवडणूक आयोगाने पंजाब पोलिसांना दिल्लीतून हटवले असून गुजरात पोलीस तैनात केले आहेत. हे काय चाललंय?," असं अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांना परत बोलवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी याबाबत भाष्य केलं. हे सर्व राजकारण सुरु असल्याचे केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांनंतर गुजरात सरकारमध्ये गृहमंत्री असलेले हर्ष संघवी यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. "मला समजले की लोक तुम्हाला फसवे का म्हणतात. केजरीवाल जी, माजी मुख्यमंत्री असूनही तुम्हाला निवडणूक आयोगाची कार्यपद्धती माहीत नाही याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी अनेक राज्यांना सक्तीची विनंती केली आहे, फक्त गुजरातच नाही," असं हर्ष संघवी म्हणाले.

"निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमधून एसआरपी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यांच्या विनंतीवरून, गुजरातमधील एसआरपीच्या आठ कंपन्या निवडणुकीसाठी ११ जानेवारी रोजी दिल्लीला पाठवण्यात आल्या होत्या. केजरीवाल जी तुम्ही फक्त गुजरातचेच नाव का घेत आहात?," असाही सवाल हर्ष संघवी यांनी केला आहे.

हर्ष संघवी यांनी त्यांच्या पोस्टसोबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका आदेशाची प्रत देखील  शेअर केली आहे. यामध्ये दिल्ली निवडणुकीत सीआरपीए, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी व्यतिरिक्त आठ राज्यांचे पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बिहार, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानच्या पोलिसांचा समावेश आहे.

दरम्यान, दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
 

Web Title: Arvind Kejriwal accuses Gujarat police of being deployed for Delhi assembly elections 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.