'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:35 PM2019-08-12T14:35:52+5:302019-08-12T14:41:01+5:30

भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे.

Article 370 Nixed as J&K was Muslim-dominated, Says P Chidambaram | 'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

googlenewsNext

चेन्नई : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर या राज्याचा विशेष दर्जा भगवा पार्टीने काढला नसता, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.  

भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप सुद्धा पी. चिदंबरम यांनी केला आहे. जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर आहे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था त्याबाबत वृत्तांकन करत आहेत. परंतू, भारतातील प्रसारमाध्यमे जम्मू-काश्मीरमधील वृत्तांकन करताना दिसत नाहीत. भाजपा असा दावा करत आहे की, काश्मीरमधील परिस्थिती निवळली आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमे काश्मीरमधील अस्थिरतेचे वृत्तांकन करत नसतील तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला. 

याचबरोबर, देशातील सात राज्यांतील सत्ताधारी प्रादेशिक पक्षांवरही पी. चिदंबरम यांनी टीका केली. राज्यसभेत विरोधी पक्षांनी भीतीमुळेच आम्हाला भाजपच्या या निर्णयाविरोधात सहकार्य केले नाही. लोकसभेत आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला ठाऊक आहे. मात्र, डीएमके, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बीजेडी, आप, टीएमसी, जेडीयू या सात पक्षांनी सहकार्य केले असते, तर विरोधी पक्षाला राज्यसभेत बहुमत मिळू शकले असते. हे निराशाजनक आहे, अशा शब्दांत पी. चिदंबरम यांनी संताप व्यक्त केला. 

जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर भाजपाने कधीच असा निर्णय घेतला नसता. त्यांनी फक्त जम्मू-काश्मीर मुस्लीमबहुल राज्य असल्यामुळेच हा निर्णय घेतला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कधीच संघर्षाची स्थिती नव्हती, असेही यावेळी पी. चिदंबरम म्हणाले. 

Web Title: Article 370 Nixed as J&K was Muslim-dominated, Says P Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.