IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:38 IST2025-10-14T20:38:16+5:302025-10-14T20:38:37+5:30
Haryana Crime News: हरियाणामधील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आज रोहतक येथील एएसआय संदीप कुमार यांनीही जीवन संपवले.

IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
हरियाणामधील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आज रोहतक येथील एएसआय संदीप कुमार यांनीही जीवन संपवले. पूरन कुमार यांनी जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून वरिष्ठांवर गंभीर आरोप केले होते. तर संदीप कुमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि व्हिडीओमधून पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात प्रचंड गुंतागुंत निर्माण झाली आहे. तसेच आता संदीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी केली आहे.
एएसआय संदीप कुमार हे रोहतक जिल्ह्याच्या सायबर सेलमध्ये तैनात होते. त्यांनी आज टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं होतं. संदीप यांच्या मृत्युमुळे कुटुंबीय आणि स्थानिकांना धक्का बसला आहे. संदीप कुमार यांनी दबावाखाली येऊन जीवन संपवल्याने त्यासाठी पूरन कुमार यांची पत्नी आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय करत आहेत. जोपर्यंत पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांना अटक केली जात नाही तोपर्यंत संदीप यांच्यावर अंत्यसंस्कार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
हरयाणामधील जींद जुलाना परिसरात राहणाऱ्या संदीप यांचे चुलत भाऊ शिशपाल आर्य यांनी सांगितले की, पूरन कुमार यांची पत्नी आणि समर्थकांवर तत्काळ केस दाखल केली गेली पाहिजे. त्यांना अटक केल्याशिवाय आमच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही. संदीप यांनी जीवन संपवल्याचं आम्हाला मान्य नाही. त्यांच्यावर दबाव आणून त्यांना जीवन संपवण्यास भाग पाडण्यात आलं आहे. जर संदीप यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली असेल, तर धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेल्या किमान ५-७ जणांना त्यांनी लक्ष्य केलं असतं. पण असं झालं नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही आहे, असा आमचा संशय आहे, असे त्यांनी सांगितले.
एएसआय संदीप कुमार हे जींदमधील जुलाना येथील रहिवासी होते. मात्र गेल्या एक वर्षापासून ते रोहतक येथील सायबर सेलमध्ये तैनात होते. मात्र आता त्यांचं अचानक निधन झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.