कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 06:21 IST2025-10-25T06:21:49+5:302025-10-25T06:21:49+5:30
‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या शौर्य आणि संयमाचे प्रतीक म्हणून इतिहासात नोंदले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.

कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या शौर्य आणि संयमाचे प्रतीक म्हणून इतिहासात नोंदले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
जैसलमेर येथे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ कमांडरांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संरक्षण दलांनी माहिती युद्ध, आधुनिक संरक्षण पायाभूत सुविधांची निर्मिती आणि आधुनिकीकरण या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाता येईल. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहे. ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर ते देशाच्या धैर्य आणि संयमाचे प्रतीक होते.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जैसलमेर येथील बैठकीत ‘ग्रे झोन वॉरफेअर’ आणि संयुक्त लष्करी कार्यक्षमतेसाठी तयार केलेल्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. या परिषदेला सीडीएस अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरमधील निर्णयप्रक्रिया स्थानिकांकडे
जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराने बजावलेल्या भूमिकेचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, कलम ३७० रद्द करणे हा ऐतिहासिक निर्णय होता. जम्मू-काश्मीरमधील निर्णयप्रक्रिया आता स्थानिक लोकांच्या हाती आहे. या सर्व बदलांमध्ये लष्कराने त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. चीनबरोबर सुरू असलेला संवाद आणि तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांनी भारताची संतुलित आणि ठाम परराष्ट्र नीती अधोरेखित केली आहे.
रोबोट श्वान, ड्रोनच्या मदतीने युद्धसराव
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेच्या जवळ भारतीय लष्कराच्या ‘थार शक्ती’ युद्धसरावाचा आढावा घेतला. त्यात शेकडो लष्करी जवानांनी वाळवंटातील प्रगत लढाऊ कौशल्ये आणि युद्धक्षमता यांचे दर्शन घडविले.
या सरावात रोबोटिक खेचर, ड्रोन, रोबोट श्वा आदींचा समावेश होता. राजनाथसिंह यांनी सीमेवरील ऐतिहासिक तनोट माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि अन्य अधिकारी होते.