आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:46 IST2025-05-10T17:45:31+5:302025-05-10T17:46:02+5:30
त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला.

फोटो - आजतक
बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच भावुक केलं. जिल्ह्यातील केशव ब्लॉकमधील नंदन गावातील रहिवासी त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला. देशसेवेच्या कर्तव्यामुळे नवविवाहित पत्नीला सोडून जवानाला सीमेवर जावं लागलं.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लष्कराने आपल्या सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सीमेवरील परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे, त्यामुळे त्यागी यादवची रजा देखील रद्द करण्यात आली आणि त्यांना ताबडतोब कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यागी यादवने दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी खास सुट्टी घेतली होती, परंतु आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत, देशाप्रती असलेलं कर्तव्य वैयक्तिक आयुष्यापेक्षा मोठं आहे. त्याचा हा निर्णय संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनला आहे. त्यागीच्या कुटुंबालाही त्याच्या देशभक्तीचा अभिमान वाटत आहे. त्याच्या पालकांनी त्याला आशीर्वाद दिला.
त्यागी यादव याचा चुलत भाऊ ओमप्रकाश यादव जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे तैनात आहे आणि मामा मंगल यादव देखील सैन्यात आहेत. तीन पिढ्यांपासून देशसेवेत असलेलं हे कुटुंब आज संपूर्ण गावाचा अभिमान आहे. पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत.
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे. लोक म्हणाले की १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही आम्ही कुठेही गेलो नाही. यावेळीही जाणार नाही. जवानांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत. जे काही लागेल ते आम्ही करू - अगदी आमचा जीवन देऊ. युद्ध झालं तरी आम्ही गाव सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे असं म्हटलं.