मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वादावादी, नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:27 IST2025-04-08T13:26:59+5:302025-04-08T13:27:24+5:30
Trinamool Congress News: मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता.

मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वादावादी, नेमकं घडलं काय?
मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांकडून या वादाबाबत आणखी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार या संपूर्ण वादाची सुरुवात तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारामुळे झाली होती.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खासदार कीर्ती आझाद यांना संसदेत संदेश नावाचं एक मिठाईचं दुकान सुरू करायचं होतं. त्यासाठी ते अर्ज करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेमध्ये संदेश मिठाई नावाचं एक दुकान सुरू करण्यासाठी काही महिला खासदारांच्या स्वाक्षरीसह कीर्ती आझाद यांनी एक पत्र तयार केल्याची माहिती कल्याण बॅनर्जी यांना मिळाली. ही माहिती मिळताच कल्याण बॅनर्जी यांनी याला विरोध केला.
त्यानंतर ४ एप्रिल रोजी कल्याण बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सात ते आठ खासदारांच्या सहीसह एक मेमोरेंडम देण्याची योजना आखली. मात्र एका महिला खासदाराला जेव्हा यावर आपली स्वाक्षरी नसल्याचे समजले. तेव्हा त्यावरून वादालासुरुवात झाली. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार कल्याण बॅनर्जी हे या महिला खासदारावर खूप नाराज आहेत. तर सदर महिला खासदारही कल्याण बॅनर्जी यांच्यावर नाराज आहे. तसेच त्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून याबाबतची तक्रार केली आहे.
दरम्यान, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या दाव्यानुसार पत्रक घेऊन जाणारा खासदार संसदेच्या बैठकीत सहभागी झाला नव्हता. तर तो थेट निवडणूक आयोगाकडे गेला. त्यामुळे दुसरा एक खासदार नाराज झाला. त्यामधून निवडणूक आयोगामध्येच दोघेही आमने-सामने आले. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. तसेच हे दोन्ही नेते एकमेकांवर ओरडू लागले. प्रकरण एवढं वाढलं की, एका खासदाराने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मध्ये हस्तक्षेप करायला सांगितले. वाद खूपच वाढला, अखेरीस हे प्रकरण ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच ममता बॅनर्जी यांनी दोन्ही खासदारांना शांत राहण्यास सांगितले, असा दावाही अमित मालवीय यांनी केला.