‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 21:32 IST2025-12-22T20:47:39+5:302025-12-22T21:32:04+5:30
Kerala Crime News: चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमधील पलक्कड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू
चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमधील पलक्कड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, त्या व्हिडीओमध्ये जमाव त्या तरुणाला त्याची ओखळ विचारताना दिसत आहेत. तू बांगलादेशमधील आहेस का? अशी विचारणा जमावातील काही व्यक्ती त्या तरुणाकडे करताना दिसत आहेत. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मृत तरुणाची ओळख राम नारायण बघेल अशी पटली असून, तो छत्तीसगडमधील रहिवासी होता. त्याला वालायार येथील अट्टापल्लम परिसरामध्ये स्थानिक लोकांच्या एका गटाने त्याला मारहाण केली. या परप्रांतीय तरुणाला चोरीच्या आरोपानंतर मारहाण करण्यात आली. मात्र बघेलजवळ चोरीचं कुठलंही सामान आढळून आलं नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मारहाण करण्यात आल्यानंतर बघेल हा खाली कोसळला. तसेच त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांनी त्याला त्वरित पलक्कड जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या पोस्टमार्टेममध्ये त्याचा शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा आढळल्या. त्यावरून त्याला बेदम मारहाण झाली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दरम्यान, मृत बघेल याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसेच मृत राम नारायण बघेल हा छत्तीसगडमधील दलित समाजातील असल्यावने आरोपींविरोधात एससीएसटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी आणि २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मृत तरुणाच्या भावाने केली आहे. आता या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.