टाळ्या- थाळ्या वाजवून अन् दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला- नरेंद्र मोदी

By मुकेश चव्हाण | Published: January 16, 2021 11:58 AM2021-01-16T11:58:21+5:302021-01-16T12:03:26+5:30

जनता कर्फ्युचा कोरोनाविरुद्ध लढाईसाठी फायदा झाला, असंही नरेंद्र मोदीं यांनी यावेळी सांगितले.

Applause and placing of lights increased the confidence of the country-PM Narendra Modi | टाळ्या- थाळ्या वाजवून अन् दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला- नरेंद्र मोदी

टाळ्या- थाळ्या वाजवून अन् दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली: कोरोना महामारीपासून सर्व देशवासियांना दिलासा देणाऱ्या आणि जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज उद्घाटन करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला.

पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असून त्यानंतर दोन आठवड्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतील, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस बनवण्यात व्यस्त असलेले वैज्ञानिक, लस बनवणारे कर्मचारी कौतुकासाठी पात्र आहेत. सामान्यत: एक लस बनण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण एवढ्या कमी वेळात एक नाही तर दोन मेड इन इंडिया लस बनवल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांनी  वैज्ञानिक आणि लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. 

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, जनता कर्फ्युचा कोरोनाविरुद्ध लढाईसाठी फायदा झाला. तसेच, टाळ्या, थाळ्या वाजवणे आणि दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला. या सर्व गोष्टींमुळे कोरोना विरोधात लढण्यासाठी देशाला मानसिक दृष्टीकोनातून तयारी करण्यास मदत झाली, असं मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. 

आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.कोरोना लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणं आवश्यक आहे. निष्काळजीपणा दाखवू नका, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. 

कोरोना लसीच्या अपप्रचाराला बळी पडू नका

कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोरोना लसीबाबत केल्या जाणाऱ्या अप्रचाराला अजिबात बळी पडू नका. आपल्याला वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी मानवतेबाबत असलेल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. ते कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस ते घरी  गेले नाहीत. काही कोरोना योद्धे माघारी घरी परतले नाहीत, असे सांगतानाच नरेंद्र मोदी भावूक झाले. 


 

Web Title: Applause and placing of lights increased the confidence of the country-PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.