जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात एक महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. या प्रकरणात अभिनेता सलमान खान व अन्य बॉलिवूड कलाकारांशी संबंधित अपिलांची सुनावणी २८ जुलै रोजी घेण्याचे राजस्थान उच्च न्यायालयाने शुक्रवारी ठरविले.
अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांना दोषमुक्त केल्याच्या विरोधात राज्य सरकारने केलेले अपील तसेच दोषी ठरविल्याने त्या विरोधात सलमान खानने केलेले अपील यावर आता पुढील सुनावणी होईल. या प्रकरणात सलमान खान याला दोषी ठरविल्याचा निकाल न्यायालयाने ५ एप्रिल २०१८ रोजी दिला. तसेच त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र सहआरोपी असलेले अन्य कलाकार व स्थानिक रहिवासी दुष्यंत सिंह यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले.
सुनावलेल्या शिक्षेविरोधात सलमान खानने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. सहआरोपींना निर्दोष ठरविण्यात आल्याच्या निकालाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. (वृत्तसंस्था)