लवकरच होणार चोक्सीची घरवापसी; मोदी सरकारला मोठं यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:02 IST2019-06-25T12:45:48+5:302019-06-25T13:02:19+5:30
मेहुल चोक्सीचं नागरिकत्व अँटिग्वा रद्द करणार

लवकरच होणार चोक्सीची घरवापसी; मोदी सरकारला मोठं यश
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. सध्या चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्याला आहे. लवकरच चोक्सीचं नागरिकत्व रद्द करणार असल्याचं अँटिग्वाच्या पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं आहे. यासाठी भारताकडून बराच दबाव आणला जात असल्याचंदेखील ते म्हणाले.
चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यात येणार असल्याची माहिती अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दिल्यानं त्याच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. चोकसीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असंदेखील ब्राऊन यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीला देशात थारा देणार नसल्याचं ते म्हणाले. पीएनबीमध्ये 13 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर आहे. 2018 मध्ये हे प्रकरण उजेडात आलं. तेव्हापासून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं.
अँटिग्वामध्ये आता चोक्सीसमोर कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक राहिलेला नसल्याचं गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं. चोक्सीचं प्रत्यार्पण जवळपास निश्चित आहे. चोक्सीशी संबंधित संपूर्ण प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारित असल्यानं अँटिग्वाकडून प्रक्रियेचं पालन केलं जाईल. या प्रकरणाची माहिती भारत सरकारला देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मेहुल चोक्सीला सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात येईल. जेव्हा त्याच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, तेव्हा त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असं ब्राऊन म्हणाले.