नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2019 चे मिशन डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करताना दिसत आहेत. उत्तर-पूर्व भागानंतर पंतप्रधान मोदी आता दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे एनडीएमधून तेलुगू देसम पार्टी बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आंध्र प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राजकीय वातावरण तापले आहे.
आंध्र प्रदेशातील कित्येक शहरांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काही पोस्टर्सवर थेट #NoMoreModi #ModiIsAMistake आणि Modi Never Again असे लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पंतप्रधान मोदी आणि अन्य नेत्यांवर धनुष्य बाणाने निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, नायडूंनी कार्यकर्त्यांना जाहिररित्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा गांधीगिरी स्टाइलने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राज्यामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने नाकारल्यानंतर टीडीपीनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
(चंद्राबाबू नायडू यांना एनडीएची दारे बंद : शहा, यू-टर्न करणारे संधिसाधू मुख्यमंत्री)