जम्मू काश्मीरमध्ये आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक
By Admin | Updated: August 27, 2015 16:08 IST2015-08-27T16:03:20+5:302015-08-27T16:08:07+5:30
जम्मू काश्मीरमधील राफियाबाद येथे सुरक्षा यंत्रणांना आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात यश आले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २७ - जम्मू काश्मीरमधील राफियाबाद येथे सुरक्षा यंत्रणांना आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात यश आले आहे. राफियाबाद येथे सैन्य व दहशतवाद्यांच्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आले आहे. या दहशतवाद्याने तो पाकिस्तानी नागरिक असल्याची कबुली दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गुरुवारी राफियाबाद येथे दहशतवादी व सैन्याच्या जवानांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात यश आले. तो दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर येत असून सखोल चौकशीसाठी त्याला श्रीनगरमध्ये आणले जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. सज्जाद अहमद असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मुळचा पाकिस्तानमधील मुझफ्फरगढ येथील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच जम्मूतील उधमपूर येथे बीएसएफच्या तुकडीवर हल्ला करणा-या मोहम्मद नावेद या पाकिस्तानी दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात यश आले होते. त्यापाठोपाठ आता दुस-या पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात यश आल्याने भारताला पाकविरोधात आणखी एक भक्कम पुरावा मिळाला आहे.