उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:40 IST2025-10-28T14:39:25+5:302025-10-28T14:40:49+5:30
Yogi Adityanath News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखीमपूर खीरी येथील दौऱ्यादरम्यान, एक मोठी घोषणा केली आहे. फैजाबादचं अयोध्या आणि इलाहाबादचं प्रयागराज असं नामकरण केल्यानंतर आता योगींनी मुस्तफाबाद शहराचं नामकरण कबाीरधाम असं करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखीमपूर खीरी येथील दौऱ्यादरम्यान, एक मोठी घोषणा केली आहे. फैजाबादचं अयोध्या आणि इलाहाबादचं प्रयागराज असं नामकरण केल्यानंतर आता योगींनी मुस्तफाबाद शहराचं नामकरण कबाीरधाम असं करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. आधीच्या सरकारांच्या काळात प्रयागराजचं इलाहाबाद, अयोध्येचं फैजाबाद आणि कबीरधामचं मुस्तफाबाद असं नाव बदलण्यात आलं होतं. आता आम्ही या शहरांची ओळख त्यांना परत मिळवून देण्याचं काम केलं आहे. विरोधी पक्ष सेक्युलॅरिझमच्या नावाखाली या गोष्टी करायचे मात्र. सेक्युलॅरिझम हे एक थोतांड आहे, असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला.
यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, संत कबीरदास यांची वाणी आजही समाजाला मार्गदर्शन करत आहे. त्यांनी निर्गुण भक्तीची अशी पावन धारा प्रवाहित केली जी समाजातील भेदभावाला दूर करून आत्मा आणि परमात्म्याचा संबंध सोप्या शब्दांमध्ये सर्वसामान्यांना समजावण्यात यशस्वी ठरली आहे.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, गुरू गोविंद दोनो खडे काके लागूं पांव... हा दोहा आजही आम्हाला गुरूच्या महत्त्वाची आठवण करून देतो. शेकडो वर्षे लोटली तरी संतवाणी ही आजही तितकीच प्रासंगिक आहे. कबीर यांनी त्या काळी समाजातीय जातीय विषमतेवर प्रहार केला होता. ‘जाति पाती पुछे न कोई, हरि को भजो सो हरि काई होई’, ही वाणी आपल्या समाजातील एकता आणि अखंडतेचा आधारस्तंभ आहे, असेही योगी म्हणाले.
यावेळी देशाची एकता तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते म्हणाले की, आजही समाजविरोधी शक्तींपासून सावध करण्याची आवश्यकता आहे. आजही समाजविरोधी शक्ती श्रद्धास्थानांवर प्रकार करण्याचा आणि जातीच्या नावाखाली फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण वेळीच आपल्यातील उणिवा ओळखल्या नाहीत, तर हे आजार कॅन्सरप्रमाणे समाजाला खिळखिळे करतील. अशा परिस्थितीत देशभक्ती हीच सर्व समस्यांवरील उपाय आहे. ही भूमी हा केवळ एक जमीनीचा तुकडा नाही, तर ही आमची मातृभूमी आणि पितृभूमी आहे. या भूमीची सेवा हीच खरी उपासना आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.