अर्थसंकल्पातील घोषणांवर काम सुरू
By Admin | Updated: July 29, 2014 01:51 IST2014-07-29T01:51:30+5:302014-07-29T01:51:30+5:30
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे फार मोठ्या आणि ‘अच्छे दिन

अर्थसंकल्पातील घोषणांवर काम सुरू
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे फार मोठ्या आणि ‘अच्छे दिन’ दाखविणाऱ्या घोषणा करण्यात आल्या नसल्या तरी आता मात्र या सर्व अर्थसंकल्पीय प्रस्तावांवर वेगाने काम करून येत्या काही आठवड्यात त्यांची अंमलबजावणी केली जाईल हे सुनिश्चित करण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील त्यावेळी बोलायला त्यांच्याकडे ठोस मुद्दे असायला हवे हे त्यामागचे कारण आहे.
कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना अर्थसंकल्पातील प्रमुख प्रस्तावांवर मोदींच्या भाषणापूर्वी म्हणजे १० आॅगस्टपासून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मोदी यांचे स्वातंत्र्य दिनी देण्यात येणारे हे पहिलेच महत्त्वपूर्ण आणि सरकारच्या कामगिरींची यादी दाखविणारे भाषण असेल. अर्थात देशाला उद्देशून केल्या जाणाऱ्या आपल्या पहिल्या भाषणात सरकारची यशोगाथा सांगता यावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे.
पंतप्रधान कार्यालय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अमंलबजावणीवरही लक्ष ठेवून आहे. तसेच धोरणांशी संबंधित इतर बाबींवरही नजर ठेवली जात
आहे.
वित्तमंत्री अरु ण जेटली यांनी १० जुलैला मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. साधारणपणे दुसऱ्या वर्षीचा अर्थसंकल्प आल्यानंतर आधीच्या अर्थसंकल्पाच्या घोषणांच्या अंमलबजावणीची लगबग सुरू होते. पण यावेळी सर्व विभागांना वेगाने काम करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्याचे निर्देश कॅबिनेट सचिवांमार्फत देण्यात आले आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)