अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:45 IST2025-11-19T19:28:51+5:302025-11-19T19:45:57+5:30
अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील सूत्रधार अनमोलला १९ नोव्हेंबर रोजी आयजीआय विमानतळावर एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती.

अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि मोस्ट वॉन्टेड आरोपी अनमोल बिश्नोईला पटियाला हाऊस कोर्टाने ११ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले आहे. अनमोलची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद एनआयएने केला . कारण त्याच्याविरुद्ध ३५ हून अधिक खून, २० अपहरण, खंडणी, धमक्या आणि हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये थेट सहभाग असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत.
अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अनमोलला १९ नोव्हेंबर रोजी आयजीआय विमानतळावर एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. त्याला कडक सुरक्षेत थेट पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले, तिथे न्यायालयाने त्याला रिमांड दिला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, संपूर्ण सुनावणी इन-कॅमेरा करण्यात आली, यामध्ये मीडियासह बाहेरील लोकांना प्रवेश नव्हता.
अनमोलच्या ताब्यात दोन भारतीय पासपोर्ट सापडल्याने बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद एनआयएने केला. खूनासह गंभीर गुन्ह्यांचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी आणि या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती, पैशांचा स्रोत आणि ज्या नेटवर्कद्वारे गुन्हे केले गेले त्याची माहिती मिळण्यासाठी कोठडी चौकशी अत्यंत महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद केला.
युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने अनमोल बिश्नोईला एनआयएकडे ११ दिवसांची कोठडी दिली, यामुळे एनआयएला त्याची कसून चौकशी करण्याची आणि संपूर्ण टोळीची चौकशी करण्याची परवानगी मिळाली