अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 07:05 IST2025-08-24T07:05:00+5:302025-08-24T07:05:42+5:30
Anil Ambani News: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ३०७३ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी बँकेने उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणी अंबानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. यापूर्वी ईडीनेही त्यांची चौकशी केली होती.

अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ३०७३ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी बँकेने उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणी अंबानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. यापूर्वी ईडीनेही त्यांची चौकशी केली होती.
अनिल अंबानी यांच्या मुंबईतील कफ परेड येथील सी-विंड या निवासस्थानी शनिवारी सकाळी सात वाजता दिल्ली सीबीआयचे सात ते आठ अधिकारी पोहोचले आणि त्यांनी ही छापेमारी केली. यावेळी स्वतः अनिल अंबानी आणि त्याचे कुटुंबीय घरी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी ईडीने स्टेट बँक आणि येस बँक यांच्याशी निगडित एकूण १७ हजार कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंबानी यांच्याशी निगडित मुंबईत एकूण ३५ ठिकाणी ५० कंपन्यांवर छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अंबानी यांची दिल्लीत सुमारे दहा तास चौकशीदेखील केली होती. त्यानंतर आता सीबीआयनेदेखील त्यांची चौकशी सुरू केली आहे.
स्टेट बँकेने अंबानी यांच्या विरोधात सीबीआयकडे दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला. अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन लि. (आरकॉम) कंपनीने स्टेट बँकेकडून घेतलेल्या ३०७३ कोटी रुपयांच्या कर्जाचा अपहार केल्याचा ठपका बँकेने त्यांच्यावर ठेवला आहे. १० नोव्हेंबर २०२० रोजी बँकेने या कर्ज प्रकरणात अंबानी यांना घोटाळेबाज ठरविले. या प्रकरणी ५ जानेवारी २०२१ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने ६ जानेवारी २०२१ रोजी हे प्रकरण जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या शुक्रवारी लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्टेट बँकेने आता अंबानी यांना अधिकृतरीत्या घोटाळेबाज ठरविले असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली.
शेअर बाजाराला दिली माहिती
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमावलीनुसार १३ जून २०२५ स्टेट बँकेने अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्याचे या लेखी उत्तरात नमूद आहे. भांडवली बाजाराच्या प्रक्रियेचा भाग म्हणून १ जुलै २०२५ रोजी ही माहिती मुंबई शेअर बाजारालादेखील कळविण्यात आली आहे. दरम्यान, आरकॉम कंपनीने सध्या अवसायानात जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.