वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 19:13 IST2025-12-29T19:11:10+5:302025-12-29T19:13:34+5:30
MBA चे शिक्षण घेणाऱ्या त्रिपुरातील तरुणाला चिनीम्हणून हिणवले; विरोध केल्याने टोळक्याने चाकूने केला जीवघेणा हल्ला

वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
देहरादून : उत्तराखंडची राजधानी देहरादून येथील एका घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. वांशिक हल्ल्यात जखमी झालेला त्रिपुरा राज्यातील एमबीएचा विद्यार्थी एंजेल चकमा याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 'देहरादूनमध्ये एंजेल चकमा आणि त्याचा भाऊ मायकेल यांच्यासोबत जे घडले, ते अत्यंत वेदनादायक आणि द्वेषातून जन्मलेली घटना आहे. द्वेष अचानक पसरत नाही, तो पेरला जातो,' अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, 'द्वेष रातोरात निर्माण होत नाही. वर्षानुवर्षे तो तरुणांच्या मनात विषासारखा पेरला जातो. चुकीची माहिती आणि जबाबदार पदांवर असलेल्या लोकांची भडकावू वक्तव्ये अशा हिंसेला सामान्य बनवत आहेत. भारत हा सन्मान, प्रेम आणि एकतेसाठी ओळखला जाणारा देश आहे, भीती आणि द्वेषासाठी नाही. आपण अन्याय चुपचाप पाहणारा समाज बनू नये. आपण देशाला कोणत्या दिशेने नेत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे,' असेही त्यांनी नमूद केले.
विघटनकारी विचारसरणी रोज जीव घेत आहे
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले की, 'देहरादूनमध्ये त्रिपुरातील एका विद्यार्थ्याची हत्या ही द्वेष पसरवणाऱ्या लोकांच्या विकृत मानसिकतेचे परिणाम आहे. विघटनकारी विचारसरणी दररोज कुणाचा तरी जीव घेत आहे. सरकारी आश्रयामुळे असे लोक मोकाटपणे वावरत आहेत. यामुळे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येत आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'शांतताप्रिय आणि सौहार्द जपणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन अशा असामाजिक घटकांना ओळखून त्यांचा सामाजिक बहिष्कार केला पाहिजे, अन्यथा उद्या कुणीही त्यांच्या हिंसेचा बळी ठरू शकतो.' अखिलेश यादवांनी सर्वोच्च न्यायालयने या प्रकरणाची स्वतःहून दखल (सुओ मोटो) घ्यावी आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
याच महिन्याच्या 9 तारखेला त्रिपुरातील एंजेल चकमा आणि त्याचा लहान भाऊ मायकेल हे देहरादूनमधील सेलाकुई परिसरात रेशन घेण्यासाठी जात होते. त्यावेळी सहा जणांच्या एका टोळीने त्यांना अडवले आणि वांशिक आधारावर टीका करत ‘चिनी’ म्हणण्यास सुरुवात केली. स्वतःला चिनी म्हणवल्याने नाराज झालेल्या एंजेलने शांतपणे त्याला विरोध केला आणि सांगितले, “मी चिनी नाही, भारतीय आहोत. हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला पुरावे द्यायची गरज आहे का?”
14 दिवस मृत्यूशी झुंज, अखेर एंजेलचा मृत्यू
मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार तसेच प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या माहितीनुसार, एंजेलच्या या उत्तरामुळे चिडलेल्या त्या सहा जणांच्या टोळीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात एंजेल चकमा गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर तब्बल 14 दिवस तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता, मात्र अखेर शुक्रवारी त्याने प्राण सोडले.
एंजेलचा भाऊ मायकेलची प्रकृतीही अजून गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी एंजेलचे पार्थिव त्याच्या मूळ राज्य त्रिपुरात नेण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण त्रिपुरा राज्यात तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणात देहरादून पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या पाच आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार असून तो नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फरार आरोपीवर 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.