Disha Bill : बलात्कार प्रकरणात 14 दिवसांत सुनावणी; 21 दिवसांत फाशी; 'दिशा' कायदा लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 17:26 IST2019-12-13T16:49:28+5:302019-12-13T17:26:54+5:30
Disha Bill : विधानसभेत दिशा विधेयक मंजूर; बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

Disha Bill : बलात्कार प्रकरणात 14 दिवसांत सुनावणी; 21 दिवसांत फाशी; 'दिशा' कायदा लागू
हैदराबाद: देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना आंध्र प्रदेश सरकारनं दिशा विधेयक मंजूर केलं आहे. आज या विधेयकावर विधानसभेत मतदान झालं. दिशा विधेयक मंजूर झाल्यानं आता अवघ्या 21 दिवसांमध्ये बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा होईल. दिशा कायद्यामुळे पोलिसांना 7 दिवसांत बलात्कार प्रकरणाचा तपास पूर्ण करावा लागेल. यानंतर 14 दिवस याबद्दल न्यायालयीन सुनावणी होईल. त्यामुळे 21 दिवसांत गुन्हेगारांना फासावर चढवण्यात येईल.
आंध्र प्रदेशच्या शेजारी असलेल्या तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वीच एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. बलात्कारानंतर चार आरोपींनी तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरणांमध्ये वेगानं न्याय दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळेच आंध्र प्रदेश सरकारनं विधानसभेत दिशा विधेयक मांडलं. आज या विधेयकाला विधानसभेनं मंजुरी दिली.
दिशा विधेयकासोबतच आंध्र प्रदेशच्या विधानसभेनं आणखी एका विधेयकालादेखील मंजूर दिली. यामुळे महिला आणि लहानग्यांविरुद्ध झालेल्या अत्याचारांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या कायद्याच्या अंतर्गत १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना होईल. याशिवाय सध्या विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले बलात्काराचे खटले पुढील ४ महिन्यांमध्ये निकाली काढले जाणार आहेत.