संतापजनक! विमानतळावर प्रवेश नाकारल्याने आमदारपुत्र भडकला; पाणीपुरवठाच रोखला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:32 PM2022-01-13T14:32:07+5:302022-01-13T14:39:20+5:30

विमानतळ अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर एका आमदाराच्या मुलाने त्याचा बदला घेतला आहे. थेट विमानतळ आणि विमानतळ कर्मचारी राहत असलेल्या क्वार्टर्सचं पाणीच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

andhra pradesh mla son cuts off water supply to tirupati airport after officials deny him entry | संतापजनक! विमानतळावर प्रवेश नाकारल्याने आमदारपुत्र भडकला; पाणीपुरवठाच रोखला

संतापजनक! विमानतळावर प्रवेश नाकारल्याने आमदारपुत्र भडकला; पाणीपुरवठाच रोखला

Next

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिरूपती विमानतळाच्या बाबतीत एक अजब प्रकार घडला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर एका आमदाराच्या मुलाने त्याचा बदला घेतला आहे. थेट विमानतळ आणि विमानतळ कर्मचारी राहत असलेल्या क्वार्टर्सचं पाणीच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पाणीपुरवठाच बंद केला आहे. मात्र संबंधित आमदाराच्या लेकाने हा आरोप फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र यावरून जोरदार निशाणा साधला आहे. 

रिपोर्टनुसार, आंध्रप्रदेशमधील तिरूपती विमानतळावर हा सर्व प्रकार घडला आहे. तिरूपतीच्या रेनिगुंटा विमानतळाचे व्यवस्थापक सुनील आणि अभिनय रेड्डी यांच्यात झालेल्या वादानंतर ही घटना घडली. अभिनय रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आमदार बी करुणाकर रेड्डी यांचे पुत्र आहेत. रेड्डी हे सत्ताधारी आघाडीतील युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मंत्री बोत्सा सत्यनारायण तिरुपती दौऱ्यावर आले होते. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेच्या समारंभासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्यासोबत तिरुपती देवस्थानचे संचालक वाय व्ही सुब्बा रेड्डी देखील होते. 

पाणीपुरवठा अचानक खंडित झाला

पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी अभिनय रेड्डी विमानतळावर गेले होते. मात्र, व्यवस्थापकांनी अभिनय रेड्डी यांना विमानतळामध्ये प्रवेश नाकारला. अभिनय रेड्डी आणि विमानतळ व्यवस्थापक सुनील यांच्यामध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेला. मात्र, तरीदेखील सुनील यांनी अभिनय रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर अभिनय तिथून माघारी फिरले. त्यानंतर या संपूर्ण विमानतळाचा आणि विमानतळ कर्मचारी राहत असलेल्या क्वार्टर्सचा पाणीपुरवठा अचानक खंडित झाला. अभिनय रेड्डी यांनीच बदला घेण्यासाठी पाणीपुरवठा खंडित केल्याचं सांगितलं जात आहे. 

"पाणीपुरवठा खंडित झाल्यावरून वायएसआरसी पक्षाची हुकुमशाही वृत्तीच दिसून येते"

तिरुपती पालिकेने मात्र हे दावे फेटाळून लावत पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याचा दावा केला. दरम्यान, यासंदर्भात विमानतळ प्रशासन किंवा पालिका प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला, तरी विरोधी पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी ट्विटरवरून अभिनय रेड्डी यांच्यावर टीका केली आहे. विमानतळ आणि कर्मचारी निवासस्थानाचा पाणीपुरवठा खंडित झाल्यावरून सत्ताधारी वायएसआरसी पक्षाची हुकुमशाही वृत्तीच दिसून येते. मी या प्रकाराचा तीव्र निषेध करतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: andhra pradesh mla son cuts off water supply to tirupati airport after officials deny him entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.