आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातील रेड्डीचेरुवूजवळ आंब्याने भरलेली लॉरी एका मिनी ट्रकवर उलटल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आंब्यांनी भरलेली लॉरी राजमपेटहून रेल्वे कोडुरूला जात असताना चिखलात अडकली. लॉरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असताना ती जवळ असलेल्या एका मिनी ट्रकवर कोसळली. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी आश्वासन दिले की, सरकार मृतांच्या कुटुंबियांना पूर्ण पाठिंबा देईल. तसेच या अपघातात जखमी झालेल्या झालेल्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्याचे त्यांनी निर्देश दिले," अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.