Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात मोठी घडामोड! सर्व मंत्र्यांचे राजीनामे, राज्यात नेमकं काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:05 IST2022-04-07T17:57:12+5:302022-04-07T18:05:00+5:30
Andhra Pradesh Ministers to Resign: आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी सरकारमधील 4 मंत्र्यांव्यतिरीक्त इतर सर्व मंत्री आपल्या पदाचे राजीनामे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात मोठी घडामोड! सर्व मंत्र्यांचे राजीनामे, राज्यात नेमकं काय घडतंय?
अमरावती: आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी(Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy) सरकार सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. राज्य सरकारमधील सर्व मंत्री आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे. आज(गुरुवारी) मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यातच हा सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आंध्र प्रदेशचे सर्व मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
4 मंत्री पदावर कायम राहणार
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ 4 मंत्री आपल्या पदांवर कायम राहू शकतील. या सामूहिक राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार असल्याची माहिती आहे. ही पुनर्रचना 9 किंवा 11 एप्रिल रोजी होऊ शकते. नव्या मंत्रिपरिषदेत सर्व 26 जिल्ह्यांतील एकाला मंत्री केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी 6 एप्रिल रोजी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी त्यांच्या आगामी योजनेची माहिती दिली आहे. त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची अंतिम यादी घेऊन ते गुरुवारी पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत.
2024 च्या निवडणुकीची तयारी
जगनमोहन रेड्डी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात ही कसरत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 4 एप्रिल रोजी राज्यात 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली आहे. तसेच, त्याच दिवशी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांचीही तिथे नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे.