मतचोरीच्या मुद्द्यावरून अमित शाह- राहुल गांधी यांच्यात जोरदार खडाजंगी; संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही : अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:46 IST2025-12-11T10:44:27+5:302025-12-11T10:46:40+5:30
राहुल गांधींनी दिले थेट चर्चेचे आव्हान

मतचोरीच्या मुद्द्यावरून अमित शाह- राहुल गांधी यांच्यात जोरदार खडाजंगी; संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही : अमित शाह
नवी दिल्ली : निवडणूक सुधारणांवरील चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केला. निवडणुकीत पराभवाचे खापर ईव्हीएम, मतदार यादी वा 'व्होट चोरी'वर फोडण्याची प्रवृत्ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचा पराभव ही नेतृत्वदोषाची देणगी आहे, असा थेट आरोप शाह यांनी केला.
चर्चेदरम्यान विरोधकांच्या बाकांवरून सतत गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी शाह यांना थेट चर्चेचे आव्हान दिल्याने अमित शाह आणि राहुल गांधी यांच्यात खडाजंगी झाली. यानंतर काही काळाने विरोधकांनी वॉकआऊट केला.
मी गेल्या ३० वर्षांपासून विधानसभा आणि संसदेत आहे. संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही. मी माझ्या भाषणाचा क्रम ठरवेन, असा हल्लाबोल शाह यांनी केला.
ते बचावात्मक भूमिकेत दिसले, उत्तर दिले नाही
राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह हे बचावात्मक भूमिकेत दिसले आणि आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर दिले नाही.
राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला पारदर्शक मतदारयादी द्या. ईव्हीएमच्या रचनेची माहिती द्या. भाजप नेते हरयाणा आणि बिहारमध्ये मतदान करत आहेत. परंतु शाह याबाबत बोलले नाहीत.
तुम्ही जगभरात भारताची प्रतिमा खराब करत आहात
शाह म्हणाले की, राहुल गांधी मतदार यादीतील त्रुटींबद्दल बोलत आहेत आणि निवडणूक आयोग अशा चुका दुरुस्त करण्यासाठी एसआयआर करत आहे.
तुम्ही जगभरात भारताच्या लोकशाहीची प्रतिमा खराब करत आहात. जर मतदार यादीत त्रुटी असतील तर तुम्ही शपथ का घेतली? ते म्हणाले, त्यांच्या काळात संपूर्ण मतपेट्या हायजॅक होत होत्या. ईव्हीएमच्या वापराने हे थांबले.
घुसखोरांच्या मुद्द्यावर ते पळून गेले : शाह
घुसखोरांना मान्यता देऊन त्यांना मतदार यादीत समाविष्ट करणे हे काँग्रेससह विरोधी पक्षांचे धोरण आहे. दरम्यान, शाह यांच्या वक्तव्याला विरोध करत काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
शाह म्हणाले की, घुसखोरांच्या मुद्द्यावर ते पळून गेले. विरोधी पक्षांनी कितीही वेळा बहिष्कार टाकला तरी आम्ही एकाही घुसखोराला देशात राहू देणार नाही. परदेशी नागरिकांना मतदानाचा अधिकार देता येणार नाही. तुम्ही घुसखोरांना संरक्षण दिले तर भाजपचा विजय निश्चित आहे.